'विकी जैन आणि सनामध्ये...'; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच जिग्ना व्होराचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 02:22 PM2023-11-26T14:22:23+5:302023-11-26T14:26:25+5:30
‘बिग बॉस 17’ या शोमधून बाहेर आल्यानंतर जिग्ना व्होराने बिग बॉस स्पर्धकांविषयी अनेक खुलासे केले आहेत.
लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस 17’ची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. शो सुरू झाल्यापासून घरातील सदस्यांमध्ये भांडणं, वाद, प्रेम आणि रुसवे-फुगवे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच ‘बिग बॉस 17’ घरातून जिग्ना व्होराला बाहेर पडावे लागले आहे. शोमधून बाहेर आल्यानंतर जिग्ना व्होराने बिग बॉस स्पर्धकांविषयी अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच जिग्ना व्होराने 'दैनिक भास्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सना रईस खान आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन दोघांमधील जवळीकतेवर भाष्य केलं. ती म्हणाली, 'दोघांमध्ये कोणतेही नाते नाही. घरामधून बाहेर पडण्यापासून विकी तिला वाचवू शकतो, असे तिला वाटते. एक पत्नी असल्याने अंकिताला वाटते की विकीने तिला भावनिक आधार दिला पाहिजे. विकी इतर लोकांमध्ये इतका व्यस्त आहे की त्याला अंकितासाठी वेळ मिळत नाही. या कारणामुळे अंकिता दु:खी आहे'.
जिग्ना व्होरा म्हणाली, 'माझी चूक एवढीच होती की मी घरात खूप प्रामाणिक होते. मी कधीही विनाकारण भांडून समस्या निर्माण केल्या नाहीत. शिवाय, माझ्या माहितीनुसार अंकिताचा प्रेग्नेंसी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि तिनेच मला हे सांगितले आहे. ही तिची एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे, त्यामुळे मला यापेक्षा जास्त काही सांगायला आवडणार नाही'.
पुढे ती म्हणाली, 'सध्यातरी स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा सध्या शोचा दावेदार असल्याचे दिसत आहे. बिग बॉसचा खेळ बदलत चालला आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीही होत आहे'. तसेच सलमान मेंटॉरपेक्षा कमी नाही. केवळ माझ्यासाठीच नाही तर घरात उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांना ते चांगले सल्ला देतात. सलमानसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्यासाठी इतका वेळ काढला हे पाहून खूप छान वाटले. सलमानसोबत स्टेज शेअर करणे ही माझ्यासाठी आयुष्य बदलणारी संधी होती'. 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धक अनेक युक्त्या लढवत आहे. त्यामुळे हा शो अधिकच रंगत होत चालला आहे.