'बिग बॉस १७' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात सेलिब्रिटींचा लाडका असलेल्या ऑरीने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. 'बिग बॉस'च्या घरात येताच ऑरीने त्याच्या दिलखुलास स्वभावाने घरातील सदस्यांची मनं जिंकून घेतली होती. पण, एका दिवसातच त्याला शोमधून एक्झिट घ्यावी लागली. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतलेला आणि अनेक सेलिब्रिटींच्या गळ्यात हात टाकून फोटो काढणारा हा ऑरी नक्की आहे तरी कोण? तो नक्की काय करतो? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. खुद्द ऑरीनेच याचा खुलासा केला.
'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेण्याआधी सलमान ऑरीला विचारतो, "तू काय करतोस हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे." यावर ऑरी उत्तर देत म्हणतो, "माझे पाच मॅनेजर आहेत. मला पार्टीचे आमंत्रण येतं. पण, मी पार्टीला जाण्याचे पैसे घेत नाही. सेलिब्रिटींबरोबर फोटो पोस्ट करून मी लाखो रुपये कमावतो. मी सेलिब्रिटींबरोबर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याचे पैसे घेतो." सेलिब्रिटींबरोबर पोझ देऊन फोटो शेअर करण्यासाठी २० ते ३० लाख रुपये घेत असल्याचा खुलासाही ऑरीने केला.
"मला लोक पार्टीमध्ये बोलवतात. आणि त्यांचे कुटुंबीय, मुलांबरोबर पोझ देऊन फोटो काढण्यास सांगतात. मी त्यांच्या बरोबर पोझ देऊन फोटो काढतो आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. यासाठी मी २० ते ३० लाख रुपये घेतो," असा खुलासा ऑरीने केला. ऑरीचं हे विधान ऐकून सलमानही आश्चर्यचकित झाला.
दरम्यान, ऑरीने एकाच दिवसात 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेतली. त्यामुळे घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला होता. दर रविवारप्रमाणे यंदाही जस्ट चिल विथ सोहेल अँड अरबाज सेशन झालं. सोहेल आणि अरबाजने घरातील सदस्यांची फिरकी घेत त्यांचं मनोरंजन केलं. पण, शेवटी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाताना ते ऑरीलाही घेऊन गेले. ऑरी फक्त एक दिवसासाठी 'बिग बॉस'च्या घरात आला होता, असं त्यांनी घरातल्या सदस्यांना सांगितलं.