बिग बॉसचा १७ वा सीझन लवकरच भेटीला येणार आहे, त्यामुळे या शोमध्ये जाणाऱ्या स्पर्धकांच्या चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांना आधीच माहित आहे की अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची या शोसाठी एन्ट्री निश्चित झाली आहे. लेटेस्ट रिपोर्टनुसार, आता या शोसाठी मन्नारा चोप्रालाही अप्रोच करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मन्नारा ही अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. तिने २०१४ मध्ये 'जिन' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय मन्नाराने संदामारुथम, कावल, जक्कन्ना, थिक्का, रोकता आणि सीथा यासह तेलुगू सिनेमांमध्येही पाऊल ठेवले. अलीकडेच, चित्रपट निर्माते एएस रवि कुमार चौधरी यांनी त्यांच्या थिरागाबादरा सामी चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान तिच्या गालावर जबरदस्तीने चुंबन घेतल्याने ती चर्चेत आली होती. या व्हिडिओचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये चित्रपट निर्मात्याच्या अचानक चुंबनाने मन्नारा थोडी अस्वस्थ झाली होती. मात्र यानंतर अभिनेत्रीने तिचा कोणताही वाईट हेतू नसल्याचे सांगितले होते.