'बिग बॉस १७'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदाच्या पर्वाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी असणार आहे. 'बिग बॉस'च्या घरात कोणते स्पर्धक येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या लिस्टमध्ये मराठमोळी अंकिता लोखंडेचंही नाव होतं. आता अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस १७'च्या घरात दमदार एन्ट्री घेतली आहे.
अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात जाण्यासाठी २०० आउटफिट खरेदी केल्याची चर्चा रंगली होती. आता खुद्द सलमान खाननेच याचा खुलासा केला आहे. अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेताच सलमानने तिची पोलखोल केली. अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात २०० कपडे, १०० नाइटसूट आणि एक चांदीचा ग्लास आणल्याचं सलमानने सांगितलं. यावर अंकिता म्हणाली, "मी खूप दिवसांनी छोट्या पडद्यावर येत आहे. त्यामुळे ही संधी मला गमवायची नव्हती. मला कॅमेरासमोर चांगलं दिसायचं आहे. मी त्याचं नियोजनही केलं आहे."
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून अंकिता प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळवून दिली. अंकिता कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटातही झळकली होती. आता पती विकी जैनसह बिग बॉसमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे.