बिग बॉस 17 चा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या (Munawar Faruqui) क्रेझमध्ये वाढ होत आहे. डोंगरीच्या या ३२ वर्षीय मुलाने बिग बॉस विजेतेपदावर नाव कोरल्याने चाहत्यांनी त्याला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आहे. विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानतर मुनव्वर जेव्हा डोंगरीत परतला तेव्हा शेकडो लोक एकत्र आले आणि त्याला उचलून घेत जल्लोष केला. दरम्यान आता नुकतंच मुनव्वर बांद्रातील एका रेस्टॉरेंटमधून बाहेर पडत असताना त्याचा चाहत्यांनी त्याला घेरले. तेव्हा तो चक्क खालीच पडला.
बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकीने काल एका रेस्टॉरंटमध्ये मित्रपरिवासासोबत पार्टी केली. यावेळी अब्दु, ईशा मालवीयसह अनेक जण दिसले. पार्टी संपल्यानंतर मुनव्वर सुरक्षारक्षकांसह रेस्टॉरंटमधून बाहेर पडला. तेव्हाच अनेक लोकांनी त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली. तसंच त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे झाले होते. यावेळी मुनव्वर अतिशय थकला असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरुन दिसत होतं. गर्दी नियंत्रणात येत नव्हती तेव्हाच मुनव्वर खाली पडला. सुपरक्षारक्षकांनी त्याला उचलून उभं केलं. मुनव्वरची क्रेझ पाहता त्याला सार्वजनिक ठिकाणी एकटं बाहेर पडणंही कठीण झालं आहे.
मुनव्वरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. कमेंट्समध्ये मात्र वेगळंच पाहायला मिळालं. मुनव्वरवर नेटकऱ्यांनी टीकाच जास्त केली.'जो पहले से गिरा है और कितना गिराओगे' अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. मुनव्वरचे जितके चाहते आहेत तितकेच त्याचे कट्टर विरोधकही आहेत.
मुनव्वर फारुकीला बिग बॉस 17 च्या विजेतेपदानंतर ५० लाख रोख आणि एक आलिशान कार मिळाली आहे. त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. मुनव्वर स्वत: एक स्टँडअप कॉमेडियन आहे. तो अनेक ठिकाणी शोज करतो. शिवाय तो उत्तम कविताही करतो. आता तर बिग बॉसची ट्रॉफीही त्याच्या नावावर झाली आहे.