Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस मराठी ५' ची सर्वत्र चर्चा आहे. अशातच 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १८' मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमधील काही स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर काही नावांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. अशातच आता एक नाव समोर आलं आहे. वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस १८'मध्ये दिसणार आहेत.
खुद्द गुणरत्न सदावर्ते यांनीच याबाबत माहिती दिली आहे. हिंदी बिग बॉसमध्ये गुणरत्न सदावर्तेंची एन्ट्री झाली आहे. 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याचं सांगितलं आहे. बिग बॉसबद्दल ते म्हणाले, "मी सदावर्ते आहे. आगे आगे देखो होता है क्या...हमारा नामही काफी है. हम डंके की चोट पर बोलते है. मला लोक घाबरतात. त्यामुळे माझ्यासमोर घरात लढाईच होणार नाही". या शोची ऑफर मिळण्याबाबत ते म्हणाले की चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधतात.
गुणरत्न सदावर्ते हे कायमट त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर ते प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार, हे पाहावं लागेल. बिग बॉस हिंदीच्या घरात एक मराठमोळा चेहरा दिसणार असल्याने प्रेक्षकही उत्सुक आहेत. दरम्यान, 'बिग बॉस १८' चा ग्रँड प्रिमियर ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. येत्या रविवार पासून 'बिग बॉस'चा हा नवा सीझन सुरू होणार आहे.