Join us  

"खंडाळा घाटात माझं Encounter करण्याचा 'मविआ'चा प्लॅन होता", गुणरत्न सदावर्तेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 12:14 PM

'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. 

Bigg Boss 18 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन संपल्यानंतर आता 'बिग बॉस हिंदी'च्या १८ व्या पर्वाची चर्चा सुरू झाली आहे. 'बिग बॉस हिंदीत काही मराठी स्पर्धकही सहभागी झाले आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात चर्चेत आलेलं एक नाव म्हणज गुणरत्न सदावर्ते. ते 'बिग बॉस हिंदी'च्या घरात सहभागी झालेत. आता 'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात खंडाळा घाटात आपलं एन्काऊण्टर करण्याचा प्लॅन होता, असा आरोप सदावर्तेंनी केला आहे. पण, जेलमध्ये संघाच्या डॉक्टरने प्राण वाचवल्याचंही सदावर्ते यांनी सांगितले. कलर्स टिव्हीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सदावर्ते यांनी घरातील इतर सदस्यांशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. 

सदावर्ते म्हणाले, "तुम्ही तीर्थयात्रेवर जाता, तशी माझी जेलयात्रा असते. जेव्हा मला जामीन मिळाला नव्हता आणि पोलिस घ्यायला आले. त्यात एक पोलिस अधिकारी माझा तिरस्कार करायचा. त्याला माझा राग होता. तेव्हा त्या जेलमध्ये एक आरएसएसचा डॉक्टर होता, त्याला मी म्हटलं, मी इथून निघालो, तर हे लोक मला संपवतील, तुम्ही फक्त इतकंच करा मला सलाईन लावून ठेवा आणि चार वाजेपर्यंत मला सोडू नका ". 

पुढे सदावर्तेंनी सांगितलं की, " त्याकाळात मी, कंगना आणि अर्नब गोस्वामी यांनी खूप स्ट्रगल केला. फक्त कंगना तुरुंगात गेली नाही, आम्ही दोघं गेलो. आम्ही तिघेही कणखरपणे त्या सरकारविरोधात लढत होतो. मला कोर्टाने जामीन मंजूर केला. मी पटापट सलाईन काढली, मला अंडा सेलमध्ये शिफ्ट केलं, जिथे कसाब, दाऊद वगैरे होते. तेव्हा माझ्या मुलीने पेनाने लिहून अर्ज केला. तेव्हा कसाबसा सुटलो. एक वरिष्ठ पोलिस अधिकारी होता, तो म्हणाला, तुला जीवदान मिळालंय, मी म्हटलं कसं काय? तर तो म्हणाला, त्यादिवशी तुझा ताबा घेतला होता, तेव्ह तुला खंडाळा घाटात संपवलं असतं", असा आरोप सदावर्तेंनी पोलिसांवर केलाय.  

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेशरद पवारउद्धव ठाकरेबिग बॉस