अभिनय करणे हे सोपे नसते. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये किशोरी आणि रूपाली त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील काही गोष्टींवर गंभीर चर्चा करताना दिसत आहेत. त्यांना दुखापत होऊनही त्याचा त्यांच्या परफॉर्मन्ससवर कधीच परिणाम झाला नाही असे बोलताना दिसत आहेत.
आपल्या नुकत्याच एका चित्रपटासाठी शूटिंग करताना झालेल्या अपघाताबाबत बोलताना किशोरी सांगतात, ''मी एका इव्हेण्टसाठी कर्जतला जात होते. एक्स्प्रेस हायवे लागण्याआधी मी ब्लॅक कॉफी घेतली आणि गाडीत बसले. कार निघाली आणि थोडंसंच पुढे गेल्यानंतर ड्रायव्हरने स्पीड ब्रेकर आला असल्याने ब्रेक मारला. त्याने त्या कॉफी ग्लासचे झाकण उडाले आणि अक्खी कॉफी माझ्या मांडीवर पडली. त्या कॉफीने माझी मांडी चांगलीच भाजली होती. पण हायवे असल्यामुळे कुठे थांबवू पण शकत नव्हतो. काही वेळानंतर आम्ही गाडी एका धाब्यावर थांबवली. तिथून आइस घेऊन लावला आणि तशीच मी इव्हेण्टला गेले. ती जख्म भरून यायला जवळजवळ दोन महिने लागले होते.''
या घटनेबद्दल ऐकल्यानंतर रूपालीने आपल्या आयुष्यातील एका घटनेविषयी सांगितले. 'एका पेक्षा एक' या शोमध्ये तिने पाठ भाजलेली असताना देखील परफॉर्म केले होते. याविषयी रूपालीने सांगितले, ''सकाळी मी शूट करायचे, मग रिहर्सल्सला जायचे आणि मग खूप दमून घरी जायचे. मी घरी कितीही वाजता आली तरी आंघोळ आणि ब्रश केल्याशिवाय मी झोपत नाही. त्यासाठी मी गीझर ऑन केला आणि अशीच जाऊन बेडवर पडले. मी थकली असल्याने मला झोप लागली. पण मला अचानक जाग आली, तशीच मी आंघोळीला गेले. जसा शॉवर ऑन केला तसे सगळे गरम पाणी माझ्या पाठीवर पडले आणि मी भाजले. सगळं शरीर पोळलं होतं. दुसऱ्या दिवशी माझा परफॉर्मन्स होता आणि नेमका माझा ब्लाऊज सीव्हलेस आणि नॉटवाला होता. ती नॉट जखमेवरच येत होती. रात्री झोपताना मला त्रास झाली नाही. पण सकाळी मला कपडेच घालवत नव्हते. सगळी स्किन निघाली होती. मी तरी त्या अवस्थेत देखील परफॉर्म केला. त्यावेळी एका पेक्षा एकच्या टीमने माझे प्रचंड कौतुक केले होते.''