पहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती. सुरुवातीपासूनच या दूरदृष्टीने मेघाचा खेळ सुरू होता. बिग बॉस च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने सहन केले. ज्या सई व पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केलेत. पण मेघा या आरोपांना पुरून उरली. मेघा, तू ‘बिग बॉस’च्या घरात ‘जान’ आणलीस, हे महेश मांजरेकर यांचे शब्द तिने अक्षरश: खरे ठरवलेत आणि सरतेशेवटी पुष्कर जोग, रेशम टिपणीस, आस्ताद काळे सारख्या दावेदारांना बाजूला सारत ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.शाळेपासून मेघाला अभिनयात रस होता. शाळेतच अनेक नाटकात तिने भाग घेतला. एकता कपूरने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत पहिला ब्रेक दिला.या मालिकेने मेघा चर्चेत आली़ घराघरात पोहोचली. यानंतर तिने अनेक हिंदी, मराठी मालिकांत काम केले़ अभिनयाशिवाय काही चित्रपटांची निर्मितीही केली. पण त्यात तिला यश आले नाही. मेघा बिग बॉसच्या घरात जितकी वादळी ठरली तितकीच तिचे खासगी आयुुष्य वादळी ठरले. ती कुमारी माता झाली. या काळात घरच्यांच्या विरोधाला तिला सामोरे जावे लागले. वडिलांनी तिला घराबाहेर काढले़ पण आईने साथ दिली. मेघाने हा प्रवास बिग बॉसच्या घरात सांगितला होता. मला बाबाने बाहेर काढले. पण आईने मला साथ दिली. माझ्या पोरीला तिने पदरात घेतले अन् तू खुशाल करिअर कर, असे मला सांगितले.