Abhijeet Bichukale's New Hairstyle: कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) हे नाव महाराष्ट्राला नवं नाही. राजकारणी आणि कलाकार असलेले बिचुकले हे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिजीत बिचुकले यांनी २५ वर्षांनी आपली आयकॉनिक हेअर स्टाईल बदलली आहे. ते आता नव्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. हा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिजीत बिचुकले यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर लांब केस, कपाळावर गंध आणि रंगबेरंगी गॉगल असा चेहरा समोर यायचा. पण, आता तसं राहिलेलं नाही. अभिजीत बिचुकले यांनी आपला चेहरामोहराच बदलून टाकला आहे. बिचुकलेंनी आयकॉनिक हेअर स्टाईल बदलून केस कापले आहेत. अगदी नव्या स्टाईलमध्ये ते पाहायला मिळाले आहेत.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "गेली २५ वर्ष आपली ती हेअर स्टाईल होती आणि ती आयकॉनिक हेअर स्टाईल दोन्ही बिग बॉसमध्ये संपूर्ण भारताच्या तरुण पीढीच्या लक्षात राहिली. २५ वर्ष झाल्यामुळे माझे हेअर स्टाईलिस्ट यांनी आणि मी विचार केला आणि नवा हेअर लूक केला. याच्यावर आता लोकांनी मांडायची आहेत. याच्यावर जाता जाता एकच बोलेन की, जर मी हेअर स्टाईल बदलली आहे तर आगे आगे देखिए होता है क्या", असे सूचक वक्तव्यही केलं.
"माझ्या पाठीमागच्या हेअर स्टाईलची प्रचंड क्रेझ आहे. २०१९ ला मराठी बिग बॉसमध्य काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये माझी हेअर स्टाईल खूप फेमस झाली. हिंदीबरोबर सलमान बरोबर सुद्धा माझी हेअर स्टाईल गाजली. त्यामुळे येणाऱ्या काळात माझे चाहते माझं अनुकरण करु शकतात", असंही बिचुकले म्हणाले. अभिजीत हे 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होते. याशिवाय सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस'च्या १५ व्या सीझनमध्ये ते सहभागी झाले होते.