'बिग बॉस ७'मधून अभिनेत्री सोफिया हयात प्रसिद्धीझोतात आली होती. अभिनय सोडून सोफिया नन झाली होती. त्यानंतर ती अध्यात्मिक गुरूही बनली होती. इंडस्ट्रीपासून दूर गेल्यानंतर सोफिया चर्चेत नव्हती. पण, नुकतंच तिच्याबरोबर दुबईत घडलेल्या घटनेमुळे सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंडशी लग्न करायला दुबईत गेलेल्या सोफियाला जेलची हवा खावी लागली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे.
सोफिया एक्स बॉयफ्रेंड मुबारक आइसा मुबारक मोहम्मद अल मेराखीबरोबर लग्न करण्यासाठी दुबईला गेली होती. पण, दुबईत पोहोचताच तिला एअरपोर्टवरच पोलिसांनी ताब्यात घेतलं.
नेमकं काय घडलं?
सोफिया म्हणाली, "३१ डिसेंबर २०२३ रोजी अल उल्ला येथे जाताना सकाळी ३ वाजता मला पोलिसांनी दुबई एअरपोर्टवरच ताब्यात घेतलं. हे सगळं अचानक घडलं. असं काही होईल याचा विचारही मी केला नव्हता. एअरपोर्टवरच मला जेलमध्ये टाकण्यात आलं. ब्रिटीश दुतावासांकडे मी फोन करण्याची मागणीही केली. पण, त्यांनी माझं ऐकलं नाही. मला अटक का केली आहे? हेदेखील मी विचारलं. तेव्हा त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितलं. मला बरं वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी मला काही काही औषधं दिली. पण, ती औषधं घेण्यास मी नकार दिला. कारण, ते काय होतं ते मला माहीत होतं. ६ तासांनंतर एका महिला पोलीस अधिकारीबरोबर मला पोलिसांच्या गाडीतून दुबई पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं. तिथे गेल्यावर मला एका खोलीत नेण्यात आलं जिथे ४ पोलीस अधिकारी होते. ते माझ्यावर ओरडून बोलत होते. ते मला म्हणाले की तू ५ लाख रुपयांसाठी एका व्यक्तीला त्रास देत आहेस. सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहेस. त्यांचं बोलणं ऐकून मला धक्का बसला आणि मी रडायला लागले. माझ्या एक्स बॉयफ्रेंडने माझ्याकडून ५ लाख ३२ हजार रुपये घेतले होते. त्याने पोलिसांनी खोटं सांगितलं कारण त्याला पैसे परत करायचे नव्हते."
सुटका कशी झाली?
सोफियाने पुढे सांगितलं की पोलिसांनी तिचा मोबाइल चेक केला. तेव्हा त्याने मी बॉयफ्रेंड मुबारक आइसाला पाठवलेला मेसेज त्यांना मिळाला. त्यामध्ये लिहिलं होतं की जर तू माझे पैसे दिले नाहीस तर मी सोशल मीडियावर तुझा चेहरा व्हायरल करेन. आणि लोकांना सांगेन की तू काय केलं आहेस. दुबईमध्ये हा एक मोठा अपराध आहे. ज्यासाठी २ वर्षांचा तुरुंगवास आणि £50,000 दंड भरावा लागू शकतो. मेसेज वाचून त्यांना कळलं की एक्स बॉयफ्रेंडने माझे पैसे घेतले आहेत. नाहीतर मला दुबईच्या जेलमध्ये जावं लागलं असतं.
सोफिया दुबईला का गेली होती?
"मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी दुबईला गेले होते. त्याबदल्यात मला तुरुंगात टाकण्यात आलं आणि दोन महिने कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं. पोलिसांनी माझा फोनही घेतला होता. या २ महिन्यात मी ४-५ दिवसांनी माझा पत्ता बदलत होते. लंडनमध्ये मुबारक उपचार घेण्यासाठी आला होता. तेव्हा आमची भेट झाली होती. तेव्हा त्याने मला लग्न करण्यासाठी आणि व्यवसाय सेट करण्यासाठी दुबईत बोलवलं होतं. पण, त्याऐवजी मला जेलमध्ये टाकण्यात आलं."