Join us

सापाचे विष पुरवठा प्रकरणात एल्विश यादवला जामीन मंजूर; पाच दिवसांनी तुरुंगाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 4:10 PM

Elvish Yadav Snake Venom Case : पाच दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर आता एल्विशला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

'बिग बॉस ओटीटी २' विनर एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रेव्ह पार्टींमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विशला रविवारी(१७ मार्च) नोएडा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात आता एल्विशला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पाच दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर आता एल्विशला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

नोव्हेंबर २०२३ मध्ये रेव्ह पार्टी प्रकरणामुळे एल्विश पहिल्यांदा चर्चेत आला होता. पोलिसांनी नोएडातील सेक्टर ४९ येथे केलेल्या छापेमारीत पाच जणांना अटक केली होती. या ठिकाणी पाच कोब्रा आणि अन्य जातीचे नऊ साप आढळून आले. या छापेमारीत सापांचे विषही पोलिसांना सापडले होते. यामध्ये एल्विश यादवचं नाव समोर आलं होतं. चौकशीनंतर एल्विश यादवला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. एल्विशला जामीन मंजूर झाल्यानंतर युट्यूबर आणि बिग बॉस फेम अनुराग डोभालने ट्विट करत "उपरवाला कभी गलत नही करेगा" असं म्हणत जामीन मंजूर झाल्याचं म्हटलं आहे. 

एल्विश पैशांसाठी रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवत असल्याचा अंदाज बांधण्यात येत होता. पण, केवळ पैशांसाठी नव्हे तर त्याचा दबदबा निर्माण करण्यासाठी आणि चाहत्यांमध्ये क्रेझ वाढवण्यासाठी एल्विश हे करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. एल्विशने रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याचे पुरावे असल्याचंही पोलिसांनी म्हटलं होतं. त्याने अशा ६ रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात अन्य दोघांना अटक करण्यात आली होती.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारसाप