'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे विकास पाटील (vikas patil). विकासचा सोशल मीडियावर कमालीचा वावर आहे. त्यामुळे तो चाहत्यांसोबत कायम काही ना काही गोष्टी शेअर करत असतो. मुंबईमध्ये राहत असलेल्या विकासची कोल्हापुरात त्याच्या मूळगावी छानशी शेतीवाडी, घर आहे. याची एक झलक दाखवणारा व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी विकासने त्याच्या गावच्या घराचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. या घराची नुकतीच त्याने वास्तुशांती केली होती. त्यानंतर त्याने आणखी एक व्हिड़ीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याची शेतीवाडी दाखवली आहे. विकास पाटील मुळचा कोल्हापुरचा असून कोल्हापूर जवळ असलेलं गलगले हे त्याचं मूळगाव आहे. या गावात त्याचं छान बैठघर असून या घरासमोर त्याची प्रचंड मोठी शेतीदेखील आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे वडील शेतात काम करत आहेत. तर, आई घरच्या गच्चावर कपडे वाळत घालत आहे.
"माझं गाव ... माझं शेत ... माझं घर, जगात भारी ... कोल्हापुरी. आई बाबा त्यांच्या कामात गर्क ... आणि मी माझ्या Missing you बायको", असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, विकासने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. तसंच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही त्याच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. विकास लोकप्रिय अभिनेता असून त्याने 'अधुरी एक कहानी' या मालिकेतून टीव्ही विश्वात पाऊल टाकले. त्यानंतर 'बायको अशी हवी', 'अंतरपाट', 'कुलवधू', 'माझीया माहेरा', 'लेक माझी लाडकी', ' वर्तुळ ','जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत त्याने काम केलं.