बिग बॉस मराठीच्या (Bigg boss marathi) माध्यमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर (sai lokur). बिग बॉसमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र, सध्या तिचा कलाविश्वात फारसा वावर नाही. लग्नानंतर जवळपास सईने कलाविश्वातून काढता पायच घेतला आहे. परंतु, सोशल मीडियावर ती चांगली सक्रीय आहे. अलिकडेच तिने तिच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामुळे ती चर्चेत होती. यानंतर तिने तिचा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
सई बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ट्रेंड फॉलो करत असते. यावेळीदेखील तिने 'कावालया' ट्रेंड फॉलो केला. 'जेलर' सिनेमातील 'कावालया' या गाण्यावरचा एक व्हिडीओ तिने इन्स्टावर पोस्ट केला. परंतु, हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केलं. विशेष म्हणजे या ट्रोलिंगचं प्रमाण इतकी जास्त आहे. ज्यामुळे सईने तिचा कमेंट बॉक्स ऑफ केला.
सईने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तमन्ना भाटियाप्रमाणे कावालयाची हुकस्टेप करत आहे. परंतु, अनेकांनी तिला वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं. अगं काय करुन घेतलंय स्वत:चं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, “तू जाडी झालीयेस”, “लै वजन वाढल”, “पाय किती सुजले आहेत”, “फिटनेस नावाची काही गोष्ट असते की नाही”, “सई काय करुन ठेवलंय स्वत:च्या इमेजचं, किती सुंदर आहेस तू तुला हे अजिबात चांगलं वाटत नाही”, अशा कितीतरी कमेंट करत तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
दरम्यान, सई सध्या थायलंडमधील फुकेत येथे सुट्टीचा आनंद घेत आहे. येथील अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सईचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला असला तरीदेखील तिने मराठी आणि हिंदी कलाविश्वात काम केलं आहे. ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे.