छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत राहिलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी (Bigg Boss marathi). सध्या या शोच्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले सोहळा रंगत आहे. जवळपास १०० दिवस या घरात राहिल्यानंतर बिग बॉसला त्यांचे शेवटचे टॉप ५ फायनलिस्ट मिळाले होते. मात्र, आता या पाच जणांमधून मीनल शहाला बाहेर पडावं लागलं आहे.
'बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेमध्ये शेवटचं एलिमिनेशन राऊंड रंगला आणि यात मीनल शहाला बाहेर पडावं लागलं. मात्र, या घरातून बाहेर पडल्यावरही तिच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता.
"मला वाटलं नव्हतं मी या घरातून बाहेर पडेन. प्रत्येकानेच मेहनत घेतली होती, प्रत्येकानेच प्रयत्न केले होते. पण मी फक्त मेहनत घेतली नव्हती. तर मी जीव लावला. ट्रॉफी जिंकायची इच्छा होती. पण, आता जातांना मी लोकांची मनं जिंकून चालले आहे", असं मीनल शहा म्हणाली.
दरम्यान, बिग बॉसच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये मीनल शहा ही एकमेव महिला स्पर्धक होती. टास्क खेळण्याची पद्धतीपासून ते घरातील सदस्यांसोबत असलेल्या मैत्रीपर्यंत मीनल अनेक कारणांसाठी चर्चेत राहिली आणि तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.