कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धेक अभिजीत बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आले होते. अभिजीतवर चेक बाऊन्स आणि खंडणी असे दोन गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला जामीन मिळाला होता. पण खंडणी प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण आता ही तक्रार मागे घेण्यात आली आहे.
अभिजीत बिचुकलेच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार फिरोज पठाण यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दिला आहे. त्या अर्जावर तसेच बिचुकले याच्या जामिनावर गुरुवार म्हणजेच २७ जूनला सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मराठी बिग बॉस सिझन २ मधील कलाकर अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी २१ जूनला मुंबई येथून अटक केली होती. या प्रकरणात त्याला दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान सन २०१२ मध्ये बिचुकले याने फिरोज पठाण यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केली असा देखील त्याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यासाठी सातारा शहर पोलिसांनी न्यायालयाकडे बिचुकले याचा ताबा मागितला होता. न्यायालयाने परवानगी देताच बिचुकलेला पोलिसांनी अटक केली होती आणि २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे अभिजीत बिचुकलेची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा येथील कारागृहात करण्यात आली होती.
दरम्यान, खंडणी प्रकरणातील तक्रारदार फिरोज पठाण यांनी खंडणीसंदर्भातील तक्रार मागे घेण्याबाबत सोमवारी सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर आणि बिचुकले याच्याही जामीनाच्या अर्जावर आता गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच बिचुकले कारागृहातून बाहेर येणार का आणि मग बिग बॉसच्या घरात जाणार का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
अभिजीत बिचुकलेला बिग बॉस मराठीमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून तो कार्यक्रमात परतणार का याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.