विद्याधर जोशी यांनी गेल्या अनेक वर्षांत मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी शुभ लग्न सावधान, अष्टवक्र, होस्टेल डेज, चेंबूर नाका, तुझा तू माझा मी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते सध्या प्रेक्षकांना बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसत आहेत. त्यांच्याविषयी एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
विद्याधर जोशी हे अनेक वर्षं अभिनयक्षेत्रात असले तरी ते आजही नोकरी करतात. ते इतके प्रसिद्ध अभिनेते असूनही नोकरी करतात हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना... हो, पण हे खरे आहे. विद्याधर जोशी आजही नोकरी सांभाळून अभिनयक्षेत्रात काम करतात ही गोष्ट त्यांनी नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात सांगितली आहे. विद्याधर जोशी आरसीएफ म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या कंपनीत आजही नोकरी करतात.
बिग बॉसच्या घरात विद्याधर जोशी यांना आपल्याला नुकतेच एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या नॉमिनेशन टास्क, वाद – विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये बिग बॉसने सदस्यांसाठी नुकतेच खूपच इंटरेस्टिंग टास्क दिले होते. सुरेखा पुणेकर – विद्याधर जोशी, किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा टास्क रंगला होता. ज्यामध्ये या चौघांना बिग बॉसने एक अनोखं आव्हानं दिले होते.
विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांना विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे होते हाच नियम किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांना देखील लागू होता. याच बरोबर दिलेल्या गाण्यावर नृत्य देखील सादर करायचे होते. हा टास्क पूर्ण करण्यासाठी विद्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली होती आणि सुरेखा पुणेकर यांनी विद्याधर यांना या रावजी ही लावणी शिकवली होती. तर किशोरी शहाणे यांनी अभिजित केळकरला अशीही बनवा बनवी या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवले. या टास्कमुळे प्रेक्षकांना बिग बॉस मराठी २ मध्ये विद्याधर जोशी यांचा एक हटके अंदाज पाहायला मिळाला.