बिग बॉस मराठीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. हा कार्यक्रम 14 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलून 21 एप्रिल करण्यात आली. पण लोकसभा निवडणुकीमुळे हा कार्यक्रम मे महिन्यात सुरू होणार होता. आता बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. हा कार्यक्रम सुरू व्हायची तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस मराठी हा कार्यक्रम 19 मे ला सुरू होणार होता. याबद्दल कार्यक्रमातील या सिझनच्या स्पर्धकांना आणि पहिल्या सिझनमधील स्पर्धकांना कळवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे चित्रीकरण 17 किंवा 18 मे ला होणार होते. पण आता बिग बॉस मराठी 26 मे ला सुरू होणार असून चित्रीकरण 24 आणि 25 मे ला होणार आहे. लोकसभेचा निकाल 23 मे ला जाहीर होणार असल्याने बिग बॉस मराठीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. प्रिमियर नाईटच्या टिआरपीमध्ये फरक पडू नये यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे म्हटले जात आहे.
बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात झाले होते. पण आता दुसऱ्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात नव्हे तर गोरेगाव फिल्मसिटीमध्ये होणार आहे आणि त्यासाठी तिथे सध्या सेट बांधण्याचे काम सुरू आहे.
बिग बॉस मराठीमध्ये कोण कोणते कलाकार सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रोमो शेअर केला असून या प्रोमोंमधून लोकांना याविषयी हिंट देण्यात आली आहे.
एबीपी माझा वृत्त वाहिनीने 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांची संभाव्य यादी जाहिर केली आहे. या यादीत त्यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, कवी मनाचे नेते म्हणून प्रचलित असलेले अभिजीत बिचुकले, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे किंवा गायिका केतकी माटेगांवकर, टिकटॉक गर्ल अभिनेत्री अमृता देशमुख, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे किंवा नेहा गद्रे किंवा नेहा शितोळे ही नावे चर्चेत आहेत.