गणेशोत्सवाची धामधूम आता सर्वत्र सुरु झाली आहे. प्रत्येकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असून, कोणाकडे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस असे बाप्पाचे वास्तव्य आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांमध्येदेखील आकर्षक बाप्पाची स्थापना झाली आहे.
प्रत्येकजण त्यांची मनोभावे पूजा करीत आहे. मात्र, विसर्जनाच्या दिवशी होत असलेल्या पर्यावरण ऱ्हासाचे गालबोट या उत्सवाला लाभत आहे. तसे होऊ नये म्हणून, इको फ्रेंडली गणपतीचा स्तुत्य उपक्रम अनेक गणेशभक्त आता अवलंबताना दिसून येत आहेत.
मराठी आणि हिंदी अभिनेत्री रुपाली भोसले हिने देखील तिच्या घरी दिड दिवसांसाठी इको फ्रेंडली बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती. या बाप्पाची खासियत म्हणजे हा बाप्पा ‘लाल माती’चा असून, याचे विसर्जन तिने घरगुती पद्धतीने केले. बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्यात आलेल्या या कुंडीत आता बीयाणं पेरले जाईल, आणि त्यातून रोपटे उगवेल. बाप्पाच्या सुबक प्रतिकृतीपासून एका झाडाची निर्मिती होत असल्याकारणामुळेच त्यास ‘ट्री गणेशा’ असे म्हंटले जाते.
याबद्दल बोलताना रुपाली भोसले सांगते की, ‘आपण सर्वजण बाप्पांची मनोभावे पूजा करतो, आणि त्यानंतर मोठ्या थाटामाटात बाप्पाला निरोप देतो. पण, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्र किनारी दिसणारे दृश्य हे भीषण असते. त्यापेक्षा त्या गणेश मूर्तीपासून एखादे रोप जर उगवता येत असेल, तर आपला बाप्पा त्या उगवलेल्या वृक्षाच्या रुपात आपल्याबरोबरच राहतो. पर्यावरण दुषित करण्याचे कारण बनण्यापेक्षा आपण या मार्गाने अधिक झाडे आपल्या अवतीभोवती दरवर्षी लावू शकतो’.
रुपालीच्या घरात गणपतीचे हे पहिलेच वर्ष असून, पहिल्याच वर्षी तिने घेतलेल्या या निर्णयाचे जितके कौतुक करावे तितके कमीच.