बिग बॉस मराठी 2 ची सध्या चांगलीच हवा आहे. या कार्यक्रमाचा फिनाले जवळ आला असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता सहा स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. शीव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे यांच्यामधील एकाला 1 सप्टेंबरला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 25 लाख मिळणार आहे.
बिग बॉसच्या घरात नुकतेच पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत सगळ्यांनी मनमुराद गप्पा मारल्या. यावेळी स्पर्धकांचा मुड खूपच चांगला होता. हा कार्यक्रम पाहात असताना हे घर आतून कसे आहे हे जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. आम्हा पत्रकारांसाठी या घरातील गार्डन परिसरात पत्रकार परिषद आयोजित केली होती. गार्डन परिसरातील अडगळीच्या खोलीच्या समोर आणि स्विमिंग पूलच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे बसले होतो. आम्हाला पाहिल्यानंतर पहिल्यांदाच मास्क न घातलेली बाहेरचे लोक आम्हाला पाहायला मिळत आहेत ही शीवची प्रतिक्रिया होती तर पत्रकारांना आम्हाला कित्येक दिवसानंतर भेटायला मिळत असल्याचा आनंद होत असल्याचे किशोरी शहाणे यांनी सांगितले. किशोरी शहाणे यांचा आवाज बसला असल्याने त्यांना बोलायला खूपच त्रास होत होता. पण तरीही त्यांनी या घरातील त्यांचे अनुभव मोकळेपणाने सांगितले.
पत्रकार परिषदेत घरामध्ये सगळ्यांचा लाडका, प्रेम मिळवणारा शीव वीणाच्या हातातलं बाहुल बनला आहे का? असे विचारण्यात आले. या प्रश्नावर शीवने म्हटले की, मी माझा वैयक्तिक खेळ खेळत असल्याने मी कोणाचेही ऐकून खेळत नाहीये. त्याचसोबत शिवानीला विचारण्यात आले तू खरोखरच तिकीट टू फिनालेसाठी पात्र होतीस का? यावर शिवानीने... हो मी पात्र होते असे उत्तर दिले आणि तिने तिची बाजू मांडली. तर “बाहेरच्या सदस्यांनी दया करून दोघींना तिकीट टू फिनाले दिले हे वीणाचे वाक्य बाकीच्या सदस्यांना अपमानास्पद वाटले का? यावर वीणा काय बोलतेय यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमात रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहेत.