बिग बॉसच्या मराठीच्या घरात असताना शिव आणि वीणा यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ते या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते. शिव आणि वीणा यांनी लग्नाचा विचार केला असला तरी शीवला त्याच्या आईची खूप भीती वाटत असल्याचे त्याने सांगितले होते.
बिग बॉस मराठी २ फिनालेच्यावेळी शीवच्या आईला शिव आणि वीणाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, बिग बॉस मराठीच्या घरात येण्याआधी शीवने मी कधीच लग्न करणार नाही असे आम्हाला सांगितले होते. त्यावर या घरात गेल्यावर सगळ्या मुलींना बहीण मान असे मी त्याला सांगितले होते. त्यावर शिवने लगेचच उत्तर दिले की, वीणा सोडून सगळ्यांना बहीणच मानले त्यावर शीवच्या आईने म्हटले की, वीणाला पण लहान बहीण मान... यावर शिव टेन्शनमध्ये आला असे वाटताच महेश मांजरेकर यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, आपल्याकडे आत्येबहिणीसोबत लग्न होते... टेन्शन घेऊ नकोस... त्यांनी असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमाचे विजेतेपद शिव ठाकरेला मिळाले असून त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख मिळणार आहेत. शिव हाच कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता.
शिव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. या कार्यक्रमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. पण खऱ्या अर्थाने लोकप्रियता त्याला बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमामुळे मिळाली. शिवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे.