‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व ( Bigg Boss Marathi 3) कुणी गाजवलं असेल तर विशाल निकम आणि विकास पाटील ( Vikas Patil) या दोन यारांनी. होय, बिग बॉसच्या घरात त्यांची मैत्री चांगलीच बहरली होती. बिग बॉस शो संपला पण अजूनही दोघांची मैत्री कायम आहे. तूर्तास चर्चा आहे ती विकासची. होय, विकासनं गावाकडे मस्तपैकी टुमदार घर बांधलं आहे. विकास कोल्हापूरमधील गलगले या गावचा. याच गावात विकासने घर बांधलं. या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो विकासने शेअर केले आहेत. सोबत एक भावुक पोस्टही.
‘कुणालाही आवडत नाही घर सोडून रहायला, जबाबदारी भाग पाडते, गाव सोडायला. परंतु गावाशी जोडलेली नाळ कायम टिकून राहण्यासाठी नवीन घर बांधले आणि त्याच्या वास्तू पूजेनिमित्ताने माझे कोल्हापूर जिल्ह्यात गलगले गावात येणे झाले,छान वेळ देता आला...गाव आणि गावाकडच्या गोष्टींची बातच निराळी...,’अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
विकासला लहानपणापासून अभिनयाची खूप आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षी ‘हमशकल’ या हिंदी चित्रपटातून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. मराठी टेलिव्हिजनविश्वात सगळ्यात जास्त एपिसोड्सचा विक्रम करणारी ‘चार दिवस सासूचे’ ही विकासची पहिली मालिका. यानंतर स्वप्नांच्या पलीकडे, माझिया माहेरा, सुवासिनी, वर्तुळ, लेक माझी लाडकी, तुझ्यात जीव रंगला, बायको अशी हव्वी, अशा अनेक मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या. 2002 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘तुकाराम’ यामध्ये त्याने ‘कान्हा’ ही व्यक्तीरेखा साकारली. ‘तुझ्या विना मरजावा’ हा त्याचा लीड रोल असलेला पहिला मराठी चित्रपट आहे.