संगीताच्या क्षेत्रात प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांनी आपल्या गायन कौशल्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आजोबा आणि वडिलांनी निवडलेली वाट न निवडता उत्कर्ष शिंदेने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. अर्थात डॉक्टर होऊनही संगीताचा वारसा पुढे नेतो आहे. डॉक्टर उत्कर्ष शिंदे गायक, गीतकार म्हणूनही काम करतो आहे. आता तो बिग बॉस मराठी ३ ( Bigg Boss Marathi 3) च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) ची पत्नीदेखील प्रख्यात डॉक्टर आहे.
बिग बॉस मराठी ३ मध्ये उत्कर्ष शिंदे चर्चेत येत असतो. एका भागाचा तो कॅप्टनदेखील झाला होता. फार कमी लोकांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल माहित असेल. उत्कर्ष शिंदेच्या पत्नीचे नाव स्वप्नजा शिंदे आहे. स्वप्नजा ही देखील एक प्रख्यात डॉक्टर आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांचे मुंबईत मोठ्या दिमाखात लग्न झाले होते.डॉ. उत्कर्ष शिंदे याचा जन्म ११ जानेवारी १९८६ मध्ये झाला. शिंदे घराण्यात जन्म झाल्यामुळे उत्कर्षच्या रक्तामध्येच संगीत आहे. त्यामुळे तो पेशाने डॉक्टर असूनही वडील आणि भावाच्या पावलावर पाऊल टाकत संगीताची आराधना देखील करतो आहे. उत्कर्षने गायलेले 'महामानवाची गौरव गाथा' हे गाणे खूपच लोकप्रिय झाले. उत्कर्षचे वडील म्हणजे प्रख्यात गायक आनंद शिंदे. आनंद यांना तीन मुले आहेत. हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श. आनंद, उत्कर्ष आणि आदर्श यांनी 'प्रियतमा' या सिनेमाच्या गाण्यासाठी पहिल्यांदा एकत्र गाणे गायले आहे.
उत्कर्षने डॉक्टरकीचे शिक्षण पुणे, मुंबई, लंडन आणि अमेरिकेत घेतले आहे. उत्कर्ष एमडी आहे. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन लंडन येथे तर पीजीडीईएस अमेरिकेत केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच उत्कर्ष हा गायक, संगीतकार इतकेच नाही तर गीतकार आणि अभिनेता देखील आहे. त्याचप्रमाणे उत्कर्ष हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे.