बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली, काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे चुकत आहेत हे सांगितले. काही सदस्य घरामध्ये दिसत नसून त्यांनी सुरू होणार्या आठवड्यात त्यांचे मत मांडावे असे सांगितले. आता सुरू झाला आहे नवा आठवडा. नव्या आठवड्यामध्ये रंगणार नवा टास्क. “जोडी की बडी” या आठवड्याची थीम असून, या थीमच्या अंतर्गत नवा टास्क रंगणार आहे.
नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे, बिग बॉस यांनी बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना एकटे फिरण्यासाठी मनाई केली आहे. इथून पुढे संपूर्ण आठवडाभर नेमून दिलेल्या जोडीदारासोबतच पूर्ण वेळ सदस्यांना खेळ खेळावा लागणार आहे असे बिग बॉस यांनी जाहीर केले. हे ऐकताच सदस्यांचे चेहरे पडले. आता या जोड्या कोणत्या असणार ? या टास्कमध्ये नक्की काय घडणार ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.
स्नेहा, आविष्कार, सुरेखा कुडची, तृप्ती, मीनल शाह आणि जय यांनी काही सदस्यांना त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. तर विशाल, विकास, उत्कर्ष आणि सुरेखा कुडची यांना वूट चुगली तर्फे त्यांच्या चाहत्यांनी पाठवलेली चुगली ऐकवली.
मीराला येतो स्नेहाचा खूप राग
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्यात जोड्या बदलताना दिसतात. पहिल्या आठवड्यात अशीच जोडी दिसून आली ती म्हणजे मीरा आणि गायत्री. यामुळे गायत्रीला महेश मांजरेकर यांनी सुनावले देखील. मीराच्या मागे मागे करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठेतरी मागे पडतो आहे. मीरा आणि गायत्री आज स्नेहा विषयी बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये मीरा गायत्रीला म्हणाली, “स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली. ती गुपचुप कीडे करते आणि मग शांत बसते, क्युट बबली दिसते. आणि म्हणूनच मी तिथे बोलले की मी इथे काही क्युट बबली बनायला आले नाही. त्यावर गायत्री म्हणाली, “स्नेहा मानत नाही तिने असे काही केले. मी स्नेहाशी बोलायला गेले. ती म्हणाली, म्हणजे मी काय करू ? मी तिला म्हणाले माझे तुला सांगणे आहे की, मला तू आवडतेस, तू गोड आहेस. आपले रिलेशन जर चांगले रहायला हवे असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोल. सुरेखा ताईंना देखील तसेच वाटले होते, आम्ही सगळे बसलो होतो त्यांनी मला सांगितले आम्ही सगळ्यांनी ते क्लिअर केले. स्नेहा माझ्याशी आधी बोलली असती असे काही आणि मी तिला उडवाउडवीची उत्तरे दिली असती तर ठीक होते मग तू मुद्दा काढलास सरांसमोर. मुळात स्नेहाने तो मुद्दा काढायलाच नको. तिच्या तोंडातून दोन शब्द नाही निघत कधी, आज पहिल्यांदा मी तिचा आवाज इतका ऐकला इतका”.