छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व (bigg boss marathi 3) विविध कारणांसाठी चर्चेत राहिलं. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामुळे हा शो संपल्यानंतरही त्यातील स्पर्धकांची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. या घरात जय दुधाणे (jay dudhane) आणि स्नेहा वाघ (sneha wagh) यांची मैत्री विशेष गाजली. मात्र, 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर जयला स्नेहाचा विसर पडल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर जयचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो 'बिग बॉस मराठी 3'च्या एका महिला स्पर्धकासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर जय आणि मीरा जगन्नाथ (mira jagnnath) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही जोडी हातात हात घालून चालतांना दिसत आहे. परंतु, त्यांचा हा व्हायरल होत असलेला फोटो एका म्युझिक अल्बममधील असल्याचं सांगण्यात येत आहे. स्नेहासोबत जशी जयची मैत्री होती तशीच मैत्री त्याची मीरासोबतही आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घराबाहेरदेखील या दोघांनी त्यांची मैत्री जपली आहे.
दरम्यान, जय आणि मीरा लवकरच जोडी दोघांची दिसते चिकनी या म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहेत. यात म्युझिक अल्बममधील त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे.