छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी (bigg boss marathi) हा रिअॅलिटी शो आता कोणालाही नवीन राहिलेला नाही. आतापर्यंत या शोचे दोन पर्व पार पडले असून आज बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले (grand finale) रंगत आहे. त्यामुळे लवकरच बिग बॉस मराठी ३ ला त्याचा विजेता मिळणार आहे. जवळपास १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यावर या शोला त्यांचे टॉप ५ फायनलिस्ट मिळाले आहेत. या पाचही जणांना प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे एका व्हि़डीओ क्लिपच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. तसंच या १०० दिवसांमध्ये काय शिकायला मिळालं? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला. ज्याचं उत्तर देताना विशाल निकम भावूक झाला.
महेश मांजरेकर यांनी ग्रँड फिनाले सुरु झाल्यानंतर बिग बॉसच्या टॉप ५ फायनलिस्टला १०० दिवसांमध्ये काय शिकायला मिळालं असा प्रश्न विचारला. ज्यावर प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्येच बिग बॉसच्या घरात आल्यानंतर नात्यांची किंमत समजली असं विशाल म्हणाला. सोबतच गावकऱ्यांची एक व्हिडीओ क्लिप पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
"या १०० दिवसांमध्ये खूप काही शिकायला मिळालं. खासकरुन घरातील आणि घराबाहेरील प्रत्येक व्यक्तीची किंमत कळाली. यात नात्यांची किंमत जास्त कळाली", असं विशाल म्हणाला. तसंच गावकऱ्यांची व्हिडीओ क्लिप पाहिल्यावरही तो भावूक झाला.
"या व्हिडीओमध्ये माझ्या गावातील प्रत्येक माणूस दिसून येतो. प्रत्येकाचं प्रेम, पाठिंबा यातून दिसतोय", असं म्हणत विशाल भावूक झाला.
दरम्यान, सध्या घरात असलेल्या' टॉप ५' फायनलिस्टला प्रत्येक प्रेक्षकांकडून प्रेम मिळतंय. परंतु, यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे येत्या काही तासांमध्येच प्रेक्षकांना कळणार आहे.