'बिग बॉस' (bigg boss marathi) हा शो घरात रंगणाऱ्या टास्कसोबतच त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधील वादविवाद आणि भांडणांमुळे चर्चेत येत असतो. सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस स्पर्धक या घरात एकत्र राहत आहेत. त्यामुळे दररोज या स्पर्धकांमध्ये मतभेद होत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आता दररोजच्या वादाला कंटाळून मीराच्या (meera jagnnath) संयमाचा बांध फुटला आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सोनाली (sonali) आणि मीरामध्ये कडाक्याचं भांडण होताना दिसत आहे. इतकंच नाही तर आता मीराच्या संयमाचा अंत झाला असून ती चक्क रडायला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये मीरा आणि सोनाली यांच्यात भांडण होताना दिसत आहे. इतकंच नाही तर रागाच्या भरात मीरा तिचं डोकं जेलच्या दरवाजावर आपटतांना दिसत आहे.
"जेव्हा काम करायचं असतं त्याचवेळी ही आजारी पडते",असं मीरा सोनालीला उद्देशून म्हणाली. त्यावर "डोक्यावरच बसते ही, काय करु मी? वेडी आहेस का तू?", असा प्रश्न सोनाली मीराला विचारते. त्यावर रागाच्या भरात मीरा वाट्टेल तसं सोनालीला बोलते.
"मी डोक्यावर बसले आहे? कालपासून ऐकते मी..कालपासून...सहन करते याचा अर्थ असा नाही की काहीही बोलेल ती" असं म्हणत मीरा अचानकपणे घरात आदळआपट करायला लागते. इतकंच नाही तर ती जेलजवळ जाऊन जोरजोरात त्याच्या दारावर हात,डोकं मारायला लागते.दरम्यान, मीरा- सोनालीमधील हा वाद आता कुठपर्यंत पोहोचणार आहे. पुढे या दोघींमध्ये काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.