‘Bigg Boss Marathi 3’मधून दादूस आऊट, घरातल्यांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:31 AM2021-11-29T10:31:24+5:302021-11-29T10:32:12+5:30
Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी 3’ च्याघरात आता केवळ आठ सदस्य उरले आहेत. होय, काल रविवारी बिग बॉस मराठीच्या घरातून आणखी एक सदस्य बाद झाला.
‘बिग बॉस मराठी 3’मध्ये (Bigg Boss Marathi 3) आता केवळ 8 सदस्य उरले आहेत. होय, काल रविवारी बिग बॉस मराठीच्या घरातून आणखी एक सदस्य बाद झाला. दादूस (Dadus) उर्फ संतोष चौधरी (Santosh Chaudhary ) याचा घरातील प्रवास काल संपुष्टात आला.
या आठवड्यात दादूस, मीरा, मीनल, विकास आणि सोनाली घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेटेड होते. यापैकी मीनल, विकास व सोनाली तिघंही सेफ झाले होते आणि दादूस व मीरा डेंजर झोनमध्ये होते. या दोघांपैकी दादूसला चाहत्यांनी सर्वाधिक कमी मतं दिलीत आणि या आधारावर दादूर घरातून बाहेर पडला. दादूसच्या जाण्यानं घरातील सर्व सदस्यांचे डोळे पाणावले. आता घरात केवळ आठ सदस्य उरले आहेत. त्यातील पाच अंतिम फेरीत जाणार आहेत.
पहिल्याच आठवड्यात दादूस चर्चेत आला होता. एका टास्कमध्ये त्याची इच्छाशक्ती पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं होतं. पण टीम ए मध्ये गेल्यापासून त्याचा खेळ बिघडला होता. दादूस म्हणजे संतोष चौधरी. मूळ गाव भिवंडीतील कामतघर. शाळेपासूनच गायनाची आवड. शाळेच्या स्नेहसंमेलनामधून गायन, निवेदन, नकला, अभिनय असे सर्व प्रकार दादूस करायचा. दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती. देवीच्या जागरणातून तो गाणी सादर करी. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात.
गाण्याचा वारसा दादूसला बाबांकडूनच लाभला. कोणतंही शास्त्रीय संगीताचं शिक्षण न घेता त्यानं आगरी कोळी लोकसंगीताला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला. बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीताचा बादशाह म्हणून दादूसची आज स्वतंत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे दादूसचा पेहराव, डोळ्यावर काळा गॉगल, गळ्यात जाड्या सोन्याच्या चेन, पाचही बोटात अंगठ्या हा प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांच्यासारखा असल्यानं मराठीतील बप्पी लहिरी म्हणूनच दादूसला ओळखलं जातं. बप्पीदा हे दादूसचे संगीतातील आदर्श आहेत.