‘बिग बॉस मराठी 3’ हा (Bigg Boss Marathi 3) शो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. रोज नवा टास्क, रोज नवा राडा हे तर सुरूच असतोच. पण यासोबत घरातील स्पर्धकांचे एक ना अनेक चेहरेही दिसतात. कधी स्पर्धक भावुक होतात, कधी रडतात, कधी आठवणींनी बेजार होतात, कधी नको इतके हळवे होतात,कधी भांडतात आणि कधी धम्माल मस्ती करतात. तूर्तास आम्ही उत्कर्षनं (Utkarsh Shinde) मीराला सांगितलेला एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.उत्कर्ष गायक संगीतकार असून डॉक्टरही आहे, हे तुम्ही जाणताच. डॉक्टरकी करत असतानाचा एक किस्सा त्यानं मीराला गप्पांच्या ओघात सांगितला. तो ऐकून मीराही क्षणभर स्तब्ध झाली.
उत्कर्ष म्हणाला, तुला एक किस्सा सांगतो, तो मला अजूनही आठवतो. मेल मेडिसीन वार्डमध्ये माझी ड्युटी होती तेव्हा. इंटर्नशिप असेन. एक आज्जी आल्या अन् माझ्या पाया पडायला लागल्या. डॉक्टर प्लीज माझ्या मुलाला वाचवा म्हणून रडू लागली. कळेना मला. मुलगा दारू पिऊन लिव्हर खराब झालेला. तरीही तिची माया एवढीच आणि ती आजी माझ्या पाया पडत होती. इतकं हललो ना मी यार... म्हटलं काय माणसाचं जीवन आहे. त्या आज्जीला अजूनही आपल्या मुलानं जगावं असं वाटत होतं. तरूण होता. लिव्हर खराब झालेलं आणि वारला तो... आता केस बंद. गेट लावलं होतं बाहेरच. त्याचा मृतदेह तिथेच ठेवला होता आणि बाहेर त्याची बायको आरडाओरड करत होती. मला माझ्या नवºयाला बघायचंय, बघायचंय...सीनिअर डॉक्टर्स होते. आम्ही शिकाऊ डॉक्टर. दार उघडलं. तिला आत सोडलं. ती टप टप चालत आली आणि मृतदेहाजवळ येऊन, चला उठा...उठा लवकर आपल्याला घरी जायचो आहे. तिच्या कडेवर छोटसं बाळ होतं. मेलेल्या नवºयाला उठा उठा म्हणत असताना तिने डॉक्टरलाच पकडलं. माझा नवरा परत द्या मला... काय उठणार तो... मी नुसता बघत राहिलो होतो. म्हणून मला त्या गोष्टीची जास्त जाणीव झाली. आपण कितीही भांडलो तरी अशा वेळेस काहीही आठवत नाही. सगळं विसरून जातो आपण....