छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं (bigg boss marathi 3) तिसरं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. अलिकडेच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी विशाल निकम (vishal nikam) हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. नुकतंच त्याचं गावात जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आता 'बिग बॉस मराठी ३' जिंकल्यानंतर मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेचं विशाल नेमकं काय करणार हे त्याने सांगितलं आहे.
'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर ढोलताशाच्या गजरात विशाल निकमचं गावात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्याच्या हातात 'बिग बॉस'ची ट्रॉफी दिसून आली. विशेष म्हणजे या ट्रॉफीसोबत त्याला २० लाख रुपयांचं चेकही देण्यात आला. त्यामुळे मिळालेल्या या बक्षीसाच्या रक्कमेचं तो नेमकं काय करणार हे त्याने सांगितलं आहे.
"मी अजूनही संघर्ष करतोय. माझ्याकडे मुंबईत स्वत: घर नाही. मी भाड्यानेच राहतो. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सुद्धा मी PG म्हणून राहायचो. त्यात अजूनही ट्रेननेच प्रवास करतोय. त्यामुळे मी हे पैसे माझ्या भविष्यासाठी वापरेन", असं विशाल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, " मला माझ्या गावकऱ्यांसाठी, माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. आणि, या प्रवासात मला साथ दिली. पण मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे. की माझ्यासारख्या सामान्य माणसाने बिग बॉस मराठीसारखा मोठा शो जिंकला."दरम्यान, विशाल निकम या 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर जय दुधाणे हा उपविजेता झाला आहे.