‘बिग बॉस मराठी 3’मधील एका सदस्याचा प्रवास काल संपला. होय, वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री घेणारा अभिनेता आदिश वैद्य काल बिग बॉसच्या घरातून बाद झाला. आदिश हा बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेणारा पहिला सदस्य होता. तो आल्याने घरातील अख्खी समीकरणं बदलतील, असा अंदाज होता. पण गेल्या आठवड्यात आदिश, मीनल शहा, विकास पाटील व संतोष चौधरी उर्फ दादूस हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. या चौघांपैकी कोण घराबाहेर जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार, आदिशचा बिग बॉस मराठीच्या या पर्वातील प्रवास संपुष्टात आला. मात्र तो बाद होताच, बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘त्याचा प्रवास सुरू होण्याआधीच तुम्ही संपवला. केवळ दादूसला वाचवण्यासाठी बिग बॉस तुम्ही चुकीचं खेळलातं, आम्ही जनता तुमच्यावर नाराज आहोत,’अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘अरे काय चाललंय... चांगल्या स्पर्धकाला बाहेर केलं आणि जे फक्त शो पीस बनून प्रेक्षकांची डोकी फिरवतात, त्यांना ठेवलं,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. फार चुकीचा निर्णय घेतला बिग बॉसने. दादूसला वाचवून तुम्ही फार चूक करताय, आदिशला परत घ्या नाहीतर आम्ही शो बघणार नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही अनेक चाहत्यांनी दिल्या होता. आदिश खरंच चांगला होता. त्याच्याऐवजी दादूरला जायला पाहिजे होता, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.