'बिग बॉस मराठी 3'च्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना अश्रु अनावर झाले. कालच्या या त्यांच्या निर्णयानंतर विशाल आणि इतर सदस्य त्यांची आज मते मांडताना दिसणार आहेत. याचसोबत दोन दिवस रंगलेल्या या बिग बॉसच्या चावडीमध्ये काहींची कानउघडणी झाली, काहींना महेश मांजरेकर यांनी समजावून सांगितले आणि काही सदस्यांना ते कसे आणि कुठे चुकले हे देखील दाखवून दिले.
वूटद्वारे आलेल्या काही अतरंगी डिमांडसाठी जय आणि विशाल राजी झाले आणि जयने त्यामध्ये बाजी मारली. त्याचसोबत चुगली बूथद्वारे जयच्या फॅनने त्याला चुगली केली आणि विकास – विशाल काय म्हणाले हे उघड केले. या नव्या आठवड्यात कोण कोणाला भिडणार ? कोणते नवे टास्क रंगणार ? कोण बाजी मारणार ? कोणाच्या हाती हार येणार ? कोणाला मिळणार कॅप्टन बनण्याचा बहुमान ? या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
शिवलीला यांच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावुक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला, “ ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर तो कधी नाही मोडणार. काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे”... मीनलने देखील सांगितले, “ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे... तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच. तिला इतक नॉलेज आहे तिच्यासमोर कोणीच ग्रेट नाहीये.
शिवलीला बाळासाहेब पाटीलने अत्यंत कमी वेळेत रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते.“इथला प्रत्येक माणूस माझा असेल” या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आणि बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं होतं. पण बिग बॉसच्या स्पर्धेतूनच शिवलीलाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कळाल्यानंतर घरातले वातावरणही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.