या ना त्या कारणानं सतत चर्चेत राहणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) सध्या ‘बिग बॉस मराठी’चं घर गाजवताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये (Bigg Boss Marathi 4) धमाकेदार एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानंतरही किरण माने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसत आहेत. आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं (Amitabh Bachchan Birthday) निमित्त साधून त्यांनी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. पोस्टसोबत त्यांनी स्वत:चा आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो पोस्ट केला आहे.
पोस्टमध्ये ते लिहितात...
..."किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो." ल्हानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हन्नार्यानं ते चिडून म्हन्लेलं असायचं, पन मनातल्या मनात मी लै खुश हुयाचो ! ल्हानपनी 'बच्चन' हे माझं 'जग' होतं... मायनीच्या 'गरवारे टुरींग टाॅकीज'च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापास्नं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता... रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो... मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची श्टोरी सांगायची...बच्चनचं चालनं - बोलनं - बघनं - उभं रहानं - बसनं - पळनं - फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलंवतं ल्हानपनी.
...त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढनारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेनारा 'ॲंग्री यंग मॅन' मनामेंदूत,रक्तात भिनला ! आता तरूनपनी मी काॅलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुनावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हनायला लागले, "हा काय स्वत:ला बच्चन समजतो की काय?"... ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !
...पन खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या साताठ वर्षांत ! तोच 'ॲंग्री यंग मॅन' वैयक्तीक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाताना, मान खाली घालून-स्वाभिमान गुंडाळून ठेवून सत्ताधार्यांच्या वळचनीला बांधला गेलेला पाहून वैषम्य वाटायला लागलं... २०१४ पूर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीका करणारा बच्चन आज ११० रूपये झाल्यावर घाबरून 'चुप्पी साधलेला' पाहून आश्चर्य वाटलं... ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं त्या पंजाबी शेतकर्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव यायला लागली..
...पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या मानसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो 'बच्चन' आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला 'बच्चन' हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की...जिवंत - रसरशीत - खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम...
किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना अचानक काढून टाकण्यात आलं होतं. हा एपिसोड चांगलाच गाजला होता. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा दावा यानंतर किरण माने यांनी केला होता. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप रंगले होते.