Join us

राखी सावंतनं स्वखर्चातून फुलवलेत भावंडांचे संसार..., अभिनेत्रीच्या मराठमोळ्या मित्राची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 4:03 PM

राखीला नुकतंच मातृशोक झाले आहे. तिच्या आईचं कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामुळे निधन झालं आहे.

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात राखी सावंत आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती इंटरनेटवर नेहमी चर्चेत असते. तिला नुकतंच मातृशोक झाले आहे. तिच्या आईचं कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामुळे निधन झालं आहे. राखी सावंत यांच्या आईचे नाव माया भेडा होते. ती अनेक दिवस आपल्या आईची सेवा करत होती. २०२१ साली राखीच्या आईवर एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी अभिनेता सलमान खान आणि सोहेल खान यांनीच राखीची मदत केली होती. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठी अभिनेता किरण माने यांनी देखील एक पोस्ट शेअर करत राखीचं सांत्वन केलं आहे. यापोस्टमध्ये किरण माने यांनी राखीची वेगळीच बाजू शेअर केली आहे. राखी आणि किरण माने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात दोघांची चांगली मैत्री झाली. मैत्रिणीच्या आईचं निधन झाल्यानंतर किरण मानेही भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.

राखी आणि किरण माने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या पर्वादरम्यान दोघांच्या मैत्रीची चर्चा देखील रंगली होती. राखीच्या आईचं निधन झाल्यानंतर किरण मानेही भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.

किरण मानेंची पोस्ट "माने, माझी आई गेली. माझा आधार गेला. मी पोरकी झाले...तुम्हाला माहित आहे माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती..मी काय करू आता???" ओक्साबोक्सी रडणार्‍या राखीचे एकेक शब्द माझ्या काळजात कालवाकालव करत होते... जवळचा मित्र म्हणून फोनवरुन सांत्वन करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो. खूप हताश झाल्यासारखं वाटलं. आपल्या मैत्रीणीवर दु:खाचा पहाड कोसळलाय आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ही हतबलता मनाला घेरून टाकत होती..

'बिगबाॅस'च्या घरात विकास आणि तेजस्विनीनंतर माझी खर्‍या अर्थानं कुणाशी मैत्री झाली असेल तर ती राखी सावंतशी ! जे कारण विक्याशी मैत्री होण्याचं होतं तेच राखीशी... विपरीत परीस्थितीचा खडक भेदून उगवून येणारे अंकुर मनापासून भावतात...वरळीतल्या अतिशय गरीब घरात लहानाची मोठी झालेली एक मुलगी बाॅलीवूडमध्ये यायचं स्वप्न बघते. वडिलांचा प्रचंड विरोध.  पोलीस हवालदाराची नोकरी करणार्‍या आणि पदरात तीन मुली असणार्‍या बिचार्‍या बापाची तरी काय चूक हो? फिल्मी दुनिया तरूण मुलींसाठी घातक आहे हेच मनात ठाम बसलेलं. ते अक्षरश: घरात कोंडून ठेवतात. पण पोरीची जिद्द लैच खतरनाक. आई हे ओळखते. आपला सगळा सपोर्ट मुलीला देते. तिच्यासोबत घराबाहेर पडते आणि तिला सांगते, "लढ तू. मी आहे खंबीर तुझ्यासोबत." 

छोटं-मोठ्ठं कसं का असेना, पण राखीनं बाॅलीवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ते मिळवलेलं स्थान तब्बल सोळा वर्ष टिकवून ठेवलं ! खायचं काम नाही हे भावांनो !! हे सगळं करताना ती एक विसरली नाही की आईचा आधार नसता तर आपण इथे नसतो. राखीनं शेवटपर्यन्त आईची मनापासून सेवा केली. आईचीच नव्हे, तर अख्ख्या घराची. अखेरच्या काळात वडिलांना सांभाळलं. दोन्ही बहिणींची लग्नं लावून दिली. स्वखर्चानं त्यांचे संसार उभे केले. भावाचा संसार सावरला. सगळ्यांना फ्लॅटपासून सगळं-सगळं घेऊन दिलं.शेवटच्या कॅन्सरच्या काळात तर आईला तिनं फुलासारखं जपलं.

राखीनं बिगबाॅसमध्ये माझ्याशी अगदी निरपेक्ष,निर्भेळ, नितळ मैत्री केली. ती शेवटपर्यन्त जपली. आम्ही पर्सनल आयुष्यातल्या अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या. मला जाणवलं की 'माणूस' म्हणून राखी शंभर नंबरी सोनं आहे ! बाहेर बोल्ड-बिनधास्त-बेधडक म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखीची हळवी बाजू मी बिगबाॅमध्ये पाहिली. काळजावर बसलेले अनेक घाव पचवून ती ताठ मानेनं उभी राहिली ती केवळ तिच्या आईकडं पाहून ! बिगबाॅसच्या घरात आम्ही दोघे बोलत असताना कितीतरी वेळा ती आईच्या आठवणीनं रडली आहे. फॅमिली वीकला आई यावी, किमान आईचा व्हिडीओ तरी दिसावा म्हणून कासावीस झालेली राखी मी पाहीलीय. राखी, आपण एकदा गप्पा मारत बसलोवतो. मी तुला एक शेर ऐकवला. "घर में धन, दौलत, हिरे, जवाहरात सब आए.

लेकिन जब घर में माॅं आयी, तब खुशियां आयी !" तू अचानक रडायला सुरूवात केलीस. आईच्या आठवणीनं व्याकूळ झाली होतीस तू. राखी, सगळ्यात मोठ्ठं, वेदनादायी दु:ख कुठलं असेल तर डोक्यावरून आईची सावली दूर होण्याचं. आम्ही किती आणि कसं सांत्वन करणार तुझं??? तुलाच खंबीरपणे यातून बाहेर पडावं लागेल. पण मला एक माहीतीय राखी, आईनंतर तुझ्या सगळ्यात जवळचं कोण असेल तर तो तुझा देव. त्या देवाजवळ तुझी आई गेलीय हे मनात ठेव. तिथे आता ती कायम 'महफ़ूज़' आहे ! मी पाहीलंय, रोज डोळे मिटून मनापासून प्रार्थना करतेस तू. त्यावेळी आता तुला देवासोबत आईही दिसेल, भेटेल. तू तिच्याशी खूप बोलू शकशील. हसवू शकशील तिला. तुझ्या खुश रहाण्यातच तिचा आनंद आहे, हे लक्षात ठेव. आम्ही जिवलग मित्र आहोतच तुझ्यासोबत. 

टॅग्स :राखी सावंतकिरण मानेबिग बॉस मराठी