बिग बॉस मराठी ४ (Bigg Boss Marathi 4) मधील स्पर्धक योगेश जाधव (Yogesh Jadhav) काल चर्चेचा विषय ठरला. जेंटल जायंट असलेला योगेश जाधव विरोधी गटांच्या हीन वागणुकीमुळे दुखावला गेला, ज्यामुळे त्याचा संयम सुटून त्याने बिग बॉसच्या घरातली खुर्ची तोडली. असे असले तरी,योगेशला बाहेरून खूप मोठा सपोर्ट मिळत आहे. बिग बॉस मराठी सीजन १चा स्पर्धक पुष्कर जोग आणि सीजन ३च्या स्पर्धक सुरेखा कुडची यांनी देखील योगेशला पाठिंबा दर्शवला आहे.
पहिल्या दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या या शोमधील स्पर्धकांमध्ये योगेश जाधव हे भारदस्त व्यक्तिमत्व प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. आपल्या रुबाबदार शरीरयष्टी आणि उंचीमुळे योगेशला टास्क खेळताना फायदा जरी होत असला तरी घरातल्या काही सदस्यांच्या आक्रोषाचा त्याला सामना करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या कॅप्टनशिप कार्यादरम्यान त्याला विरोधी टीमकडून हिनवण्यात आले.
मेघा घाडगे यांनी तुझा मेंदू गुडघ्यात आहे यांसारखी भाषा वापरली तर त्रिशूल मराठेने त्याच्या शरीरयष्टी वरून त्याला सुनावले. याआधी सुद्धा विरोधी टीममधील पुरूष सदस्यांबरोबर त्याचे वाद झाले असल्यामुळे, पहाडासारखा असलेला योगेशचा अखेर बांध फुटला.
योगेशचा सुटलेला संयम पाहता त्याला बिग बॉसकडून समझ देखील देण्यात आली. त्यादरम्यान, आईची आठवण येऊन योगेश ढसाढसा रडताना सर्व महाराष्ट्राने पाहिला. जेंटल जायंट असा कोसळताना पाहून त्याच्या चाहत्यांना देखील अश्रू अनावर झाले. त्यांनी सोशल मीडिया वर सपोर्ट टू योगेश जाधव हा हॅशटेग देखील ट्रेंड करत आहे.