‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4 ) वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला. नेहमीप्रमाणे या सीझनमध्येही प्रेम, राग, लोभ, दंगा, मस्ती, राडे असं सगळं काही पाहायला मिळालं. चौथ्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांनी एन्ट्री केली आणि बघता बघता अनेकांनी घराचा निरोप घेतला. आता घरात किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत व आरोह वेलणकर असे सदस्य राहिले आहेत आणि आता ‘बिग बॉस मराठी 4’च्या निरोपाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.
होय, गेल्या 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या नववर्षाच्या सुरुवातीला ‘बिग बॉस मराठी 4’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. त्याची तारीखही समोर आली आहे. येत्या 8 जानेवारीला ‘बिग बॉस मराठी 4’चा ग्रँड फिनाले होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर हा फिनाले प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थात कलर्स मराठी वाहिनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कोण होणार विजेता?‘बिग बॉस मराठी 4’चा विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. घरातील 76 वा दिवस पार पडला आहे. त्यामुळे आता विजेता कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी केवळ 2 आठवड्यांचा कालावधी उरला आहे. प्रसाद जवादे आणि अमृता धोंगडे हे ‘बिग बॉस मराठी 4’च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र मायबाप प्रेक्षक कोणाला आपला कौल देतात, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.