कलर्स मराठीवर लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) सुरू होतोय. साहजिकच बिग बॉस प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा चौथा सीझनही महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) होस्ट करणार आहेत. पण यावेळी जरा हटके पद्धतीने. होय, हा ताजा प्रोमो पाहून तुम्हीही हेच म्हणाल.
महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’च्या चावडीवर स्पर्धकांची जी काही शाळा घेतात, ते तुम्हाला ठाऊक आहेच. मांजरेकरांपुढे बड्या बड्यांना घाम फुटतो, तो म्हणूनच. पण यंदा चिंता नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांची शाळा भरेल. पण यावेळी मांजरेकर जरा नवी स्टाईल वापरणार आहेत. विश्वास बसत नसेल तर हा प्रोमो तुम्ही पाहायलाच हवा. कलर्स मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टा हँडलवर ‘बिग बॉस मराठी 4’चा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मांजरेकर राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत.
या प्रोमोमध्ये मांजरेकरांच्या हातात ‘राग शांत करण्याचे 101 उपाय’ नावाचं पुस्तक आहे. ‘यावेळी विचार करतोय शांतपणे होस्ट करायचं. चिड चिड करायची नाही...,’ असं मांजरेकर प्रोमोमध्ये म्हणतात आणि मग स्वत:च जोरजोरात हसू लागतात. आता ते का हसतात, याचं कारण तुम्हाला कळलं असेलच...! प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे मांजरेकर खरंच शांतपणे स्पर्धकांची चावडीवर शाळा घेणार का? ‘राग शांत करण्याचे 101 उपाय’ पुस्तक त्यांना किती उपयोगी पडणार? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. शिवाय मांजरेकरांच्या हसण्याचा अर्थही लवकरच कळणार आहे.
‘बिग बॉस मराठी 4’ सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे 24 सप्टेंबरला कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडू शकतो. त्याजागी ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होऊ शकतो.