Bigg Boss Marathi 4 : ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो, तो छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो परत येतोय. होय, आम्ही बोलतोय ते ‘बिग बॉस मराठी 4’बद्दल. ‘बिग बॉस मराठी 4’चं काऊंटडाऊन सुरू झालंय. यंदाचा सीझन काही नव्या सरप्राईझेसह सज्ज आहे. नवं घर, नवे सदस्य, नवे राडे, नवे वाद, नवी मैत्री असं सगळं काही या सीझनमध्ये बघायला मिळणार आहे.केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे,मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर पुन्हा एकदा हा शो होस्ट करताना दिसणार आहेत. ‘ऑल इज वेल’ अशी यंदाच्या सीझनची थीम असणार आहे. यानिमित्ताने मांजरेकरांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुम्हाला कोणते स्पर्धक बघायला आवडतील? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं.
होय, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुम्हाला कोणते स्पर्धक बघायला आवडतील? असा प्रश्न मांजरेकरांना विचारण्यात आला. यावर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मला सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव आणि प्रवीण तरडे यांना पाहायला आवडेल, असं ते म्हणाले. हे सर्वजण बिग बॉस मराठीच्या घरात आलेच तर कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील, असंही ते म्हणाले.‘बिग बॉस मराठी 4’ येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप याबद्दल तरूण पिढीमध्ये खूपच उत्सुकता असते.
‘ बिग बॉस मराठी’च्या या सिझनमध्ये 16 जण एका घरामध्ये राहाणार आहेत ते पण 100 दिवस. म्हणजे रोज तक्रारी होणार, तर कधी हास्य बहार, कधी प्रेम,तर कधी भांडणं... कधी रुसवे - फुगवे तर कधी मैत्री... आपल्या घरात आपण जशी शुल्लक गोष्टींना घेऊन भांडणं करतो तसेच या घरात देखील होणार आहे. असं आताना सगळं ‘ऑल ईज वेल’ दिसेल का ? हा प्रश्न आहे. कारण ‘ऑल इज वेल’ म्हणणं सोपं आहे पण ते कितपत निभावू शकतील ते प्रेक्षकांना बघायचं आहे.