Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. अशात काल प्रसाद जवादे घरातून बाहेर झाला. प्रसाद गेममधून आऊट झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. प्रसाद हा बिग बॉस मराठी 4 च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र काल त्याचा घरातील प्रवास संपुष्टाला आला. घराबाहेर जावं लागणार, हे ऐकताच प्रसादच्या डोळ्यांत अश्रू दाटले. घरातील अन्य सदस्यही भावुक झालेत. बाहेर पडल्यावरही प्रसादने एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. आता यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी प्रसादच्या एलिमिनेशनवर दु:ख व्यक्त केलं. अनेकांनी बिग बॉसच्या निर्णयावर आगपाखड केली. अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
‘या पुढे कोणत्याही कलाकारांनी बिग बॉस मराठीमध्ये भाग घेऊ नये. फुकट तुमचाही आणि आमचाही वेळ वाया घालवू नका. हा बिग बॉस मराठीचा शेवटचा सीझन ठरवावा. प्रसादला बाहेर काढण्याचा निर्णय दुर्दैवी आहे, असं एका युजरने म्हटलं. असं एका प्रेक्षकाने प्रसादच्या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘प्रसादला जाताना बघवत नव्हतं महाराष्ट्राला. जनतेनं स्वप्न पाहिलं होतं की बिग बॉस मराठी 4 चा विनर प्रसाद जवादे होणार. आता ह्या सगळ्यावर पाणी फेरलं. आता बिग बॉस मराठी बघण्यात काहीच अर्थ उरला नाही,’अशी कमेंट एका युजरने केली.
कदाचित प्रेक्षकांच्या मतांना काहीही किंमत नाही. किंमत असती तर आज प्रसाद बिग बॉसच्या घरात असता आणि धोंगडे बाहेर पडली असती, अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात दु:खद क्षण म्हणजे प्रसादचा धक्कादायक निष्कासन. तुझ्या हक्काची ट्रॉफी होती, जी तुझ्याकडून हिसकवून घेण्यात आली,’अशी भावना एका चाहत्याने व्यक्त केली. आज पासून बिग बॉस मराठी बघणं बंद.., अशा शब्दांत अनेकांनी आपला संताप व्यक्त केला.प्रसाद आऊट झाल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर, अपूर्वा नेमळेकर हे सदस्य उरले आहेत. यांच्यापैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.