ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेलं बिग बॉस मराठी ४ (Bigg Boss Marathi 4) हे पर्व जानेवारी २०२३ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा सध्या सुरू असून या सोहळ्यात कोण विजेता ठरणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान टॉप ५मधून राखी सावंत (Rakhi Sawant) ९ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली आहे. तर अमृता धोंगडे(Amruta Dhongade)देखील घराबाहेर पडली आहे. या महाअंतिम सोहळ्याला सुरूवातीपासून सहभागी झालेले १६ सदस्य आणि आधीच्या सीझनमधील काही स्पर्धकही पाहायला मिळाले. मात्र यात या सीझनमधील कपल गैरहजर दिसले. तुम्हाला कळलं ना आम्ही कोणाबद्दल बोलतोय. नाही कळलं. आम्ही रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) आणि डॉ. रोहित शिंदे (Dr.Rohit Shinde) यांच्याबद्दल बोलतो आहे. ते दोघे या ग्रॅण्ड फिनालेमध्ये गायब आहेत. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा बिनसलं की काय, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी एकत्र सहभागी झाली होती. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या कपलमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले. त्यानंतर आधी रुचिरा जाधव ही घराबाहेर पडली. त्यानंतर काही आठवड्यांनी रोहित शिंदेदेखील बाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतरही सोशल मीडियावर त्यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर ते दोघे ब्रेकअप करणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या. दरम्यान रुचिराने वेळ मागितला आहे, असे रोहितने सांगितले होते.
महाअंतिम सोहळ्याआधी ‘बिग बॉस’च्या घरात एक रियुनियन आयोजित करण्यात आले होते. या रियुनियनमध्ये या पर्वातील सर्व स्पर्धक सहभागी झाले. यावेळी रुचिरा आणि रोहितही होते. पण त्यांच्यात अबोला दिसला. त्यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी प्रसाद पुढे आला. सर्व गैरसमज विसरून एक व्हा असं सांगत त्याने त्या दोघांना एकमेकांना खीर भरवण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे त्या दोघांनी एकमेकांना खीर भरवत त्यांच्यातला अबोला मिटला असल्याचं दाखवलं. मात्र आता ग्रॅण्ड फिनालेमध्ये ते दोघे दिसत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा काही बिनसलं का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.‘