Bigg Boss Marathi 4: मराठी 'बिग बॉस'चं चौथं पर्व सध्या सुरू आहे आणि बिग बॉस म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट हे सारं आलंच. सध्या मराठी 'बिग बॉस'च्या घरातील एका सदस्यानं सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. तो सदस्य म्हणजे प्रसाद जवादे. आता ज्यांनी हा शो सुरुवातीपासून पाहिलाय त्यांना लक्षात आलंच असेल की बिग बॉसच्या घरात दाखल होतानाचा प्रसाद आणि आता ७० दिवसांनंतरचा प्रसाद यात किती फरक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
कोणत्याही चर्चेत, कार्यात अगदी हिरिरीने भाग घेणारा प्रसाद आता कमालीचा शांत झाला आहे. सध्या तो कुणाशीच फार बोलत नाही किंवा आपलं मतही व्यक्त करताना टाळाटाळ करतो. प्रसाद सध्या इतका शांत झालाय की या शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकरांनाही त्याचं वागणं कळेनासं झालं आहे. त्याच्या या बदललेल्या स्वभावानं घरातील सदस्यही बुचकळ्यात पडले होते. प्रत्येकानं त्याच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रसादनं कुणालाच फार काही महत्व दिलेलं नाही. पण आता त्याच्या वागण्यामागे त्याची स्ट्रॅटजी तर नाही ना? असा सवाल प्रेक्षक उपस्थित करू लागले आहेत. याचं कारण म्हणजे आता बिग बॉसचा यंदाच्या पर्वाचा विजेता मिळण्यासाठी आता फक्त २१ दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि प्रसाद इतर सदस्यांच्या तुलनेत सर्वाधिक नॉमिनेट झालेला सदस्य आहे. पण अजूनही तो घरात आपलं स्थान पक्कं करुन राहिला आहे.
'बिग बॉस'च्या चावडीवर महेश मांजरेकर यांनीही या गोष्टीचा उल्लेख केला. प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे आजवर सर्वाधिक नॉमिनेट झालेले आहेत. पण ते घरात आपलं वेगळं स्थान पक्कं करुन उभे आहेत, असं मांजरेकर म्हणाले. त्यामुळे प्रसादचं वागणं घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना बुचकळ्यात टाकणारं वाटत असलं तरी आता त्याचा हा गेमप्लान असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रसादचं शांत राहणं हीच त्याची जमेची बाजू तर ठरत नाहीय ना अशी शक्यता निर्माण झालीय. कारण टास्कवेळी दिसणारा प्रसाद आणि विकेंडला 'बिग बॉस'च्या चावडीवर दिसणारा प्रसाद यात बराच फरक स्पष्ट दिसून येत आहे.
नॉमिनेशन टास्कमध्ये जवळपास प्रत्येकवेळी प्रसाद नॉमिनेट झालेला आहे. पण प्रत्येकवेळी प्रेक्षकांनी प्रसादला एक संधी दिली आहे. प्रसाद नॉमिनेट असताना आतापर्यंत निखिल राजेशिर्के, समृद्धी जाधव, योगेश जाधव, यशश्री मसुरकर, मेघा घाडगे, विकास सावंत, रुचिरा जाधव, डॉ. रोहित शिंदे आणि स्नेहलता वसईकर यांना घरातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे प्रसादला मिळणारा पाठिंबा भक्कम असल्याचं दिसून येतं. आता याच पाठिंब्यासह प्रसाद जवादे बिग बॉसची फायनल गाठणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.