Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील सदस्यांवर दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये दोन टीम पाडण्यात आल्या असून त्यांना बाळांना सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा टास्क करताना बिग बॉसने सदस्यांना काही नियम दिले आहेत. यापैकी एक नियम म्हणजे सदस्यांना बाळाशी फक्त मराठीतच संवाद साधता येणार आहे. या टास्कमध्ये अंकिता बाळाशी मालवणी भाषेत बोलते. तेव्हा वैभव तिला मालवणी ही मराठी भाषा नाही असं म्हणतो. यावरुन वैभवला ट्रोल केलं जात आहे.
मालवणी ही मराठी भाषा नाही, असं म्हणणाऱ्या वैभववर नेटकरी नाराज आहेत. मराठी अभिनेताअभिजीत केळकरनेदेखील याबाबत पोस्ट शेअर करत वैभवला सुनावलं आहे. अभिजीतने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये "मालवणी ही मराठी भाषा नाही?? बौद्धिक दिवाळखोरी", असं म्हटलं आहे. अभिजीतने ही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "कोण आहेत हे लोक आणि नक्की कुठल्या राज्यातून आले आहेत? हे लोक खरे परप्रांतीय आहेत. ज्यांना मालवणी भाषा, मराठी भाषा वाटत नाही. हे स्वतः मराठी म्हणून जी भाषा बोलतात, ती भाषा "धेडगुजरी मराठी", म्हणून आम्ही चालवून घेतोच आहोत की...देवा म्हाराजा, ह्यांका Bigg Boss Marathi 5च्या घरातून, हुसकून भायेर काड आनी "मालाडच्या मालवणीत" नेऊन सोड म्हाराजा, व्हय म्हाराजा", असंही अभिजीतने पुढे लिहिलं आहे.
दरम्यान, घरातील या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर आहे. या छोट्या पाहुण्यांचा सांभाळ करताना घरातील सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या टास्कमध्ये आता कोणती टीम जिंकणार हे पाहावं लागणार आहे.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण