Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर असताना घरातील समीकरणं पुन्हा बदलत असल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवसापासून एकत्र असलेल्या आणि बिग बॉसच्या घरात चांगली मैत्री झालेल्या अभिजीत आणि अंकितामध्ये मात्र खटके उडत आहेत. निक्कीमुळे अंकिता अभिजीतवर नाराज असल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत अंकिता, डीपी आणि निक्कीमध्ये वॉशरुममध्ये अभिजीतवरुन चर्चा होत आहे. निक्की विचारते, "अभिजीत गेला का?". त्यावर अंकिता म्हणते, "हो, तू इथे होतीस ना". त्यानंतर निक्की तिला "त्यात काय झालं तुम्ही नॉर्मलच तर बोलत होतात", असं म्हणते. अंकिता त्यानंतर अभिजीतला टोमणा मारत निक्कीला म्हणते, "त्यासाठी हिंमत लागते. बघ थोडीशी हिंमत दे त्याला...गरज आहे". अंकिताशी बोलल्यानंतर निक्की बाहेर येऊन अभिजीतला विचारते की "मी आले म्हणून पळाला का?".
अभिजीत उत्तर देत म्हणतो, "नाही. त्या दोघांमध्ये चर्चा सुरू होती". त्यावर निक्की म्हणते, "ती म्हणत होती की त्याला जरा हिंमत देते. मी तुला विचारेन मग तुला उत्तर देता येणार नाही. म्हणून तू पळाला". निक्कीचं बोलणं ऐकल्यावर अभिजीत म्हणतो, "काय पागलपणा आहे". वॉशरुममध्ये अंकिता डीपीदादाला म्हणते, "आजपर्यंतच्या टास्कमध्ये याने कोणतंही प्लॅनिंग केलं नाही. आणि याला आमचा गेम दिसत नाहीये. याला माझा गेम दिसत नाहीये". तर बाहेर निक्की म्हणते, "खरं तर सूरजला अंकिताचा राग आला पाहिजे. तिने फक्त सगळं दिखाव्यासाठी केलं". अभिजीत म्हणतो, "उगाच चांगलं पांघरुण घालून वाईट कशाला बोलायचं".
दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. निक्कीने फिनालेचं तिकीट मिळवून ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, आणि धनंजय यांच्यावर नॉमिनेशनची तलवार आहे. या आठवड्यात मिड एव्हिक्शन होणार असून एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.