Join us

मुलगी म्हणून मी कमी पडले! अंकिता वालावलकर भावुक, म्हणते-"शाडुच्या मातीची २-३ फूट मूर्ती उचलणं मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 1:12 PM

अंकिताच्या सोशल मीडियावरुन गणेशोत्सवातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

Bigg Boss Marathi 5: अंकिता वालावलकर ही बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. कोकण हार्टेड गर्ल पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. अंकिता बिग बॉसच्या घरातही टास्कदरम्यान रणनीती आखताना दिसते. सध्या बिग बॉस मराठीचं घर गाजवणारी अंकिता गणेशोत्सवात घरी नसल्याने भावुक झाली आहे. बिग बॉसच्या घरातही गणपतीला गावी जायला मिळणार नसल्यने अंकिताला अश्रू अनावर झाले होते. 

अंकिताच्या गावी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. पण, यंदा मात्र अंकिताविनाच गावच्या घरी गणेशोत्सव साजरा केला गेला. अंकिताच्या सोशल मीडियावरुन गणेशोत्सवातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. अंकिताच्या वडिलांचा विसर्जनानंतरचा डोक्यावर रिकामा पाट घेऊन चालत असल्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अंकिताने तिच्या वडिलांसाठी एक खास मेसेज दिला आहे. 

अंकिता वालावलकरची पोस्ट 

बाबा,

आतापर्यंत आपल्यात बरेच आंबट गोड खटके उडलेत. कधी तुम्ही चिडलात तर कधी मी रुसले. पण खरं सांगू बाबा कितीही मतभेद असले तरी तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत आणि तुमचं प्रेम आम्हाला नेहमी दिसलं. आज ही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे.

लहानपणी मी ठरवलं होतं की मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. लहानपणी फटाक्यांसाठी हट्ट करायचो पण तुम्ही महाग म्हणून द्यायचा नाहीत आणि आता नेहमी फटाके घेऊन समुद्रावर येता आणि आम्ही वाजवतदेखील नाही. तुमच्या हातातली ती फटाक्यांची पिशवी कायम भरलेलीच असते.

नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार? विसर्जनच्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फूट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हतं. पण big bossच्या घरी असताना देखील खूप आधी मी हया सगळ्याची व्यवस्था करून आलेय,तुम्हाला काळजी करावी लागणार नाही. ७व्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील .काळजी करू नका 😅 

गेल्यावर्षी बाप्पासोबत रात्री गप्पा मारल्या होत्या मी जेव्हा सगळे झोपले होते,आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी ❤️...

अंकिताच्या अकाऊंटवरुन शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अंकिताने पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात खेळ दाखवायला सुरुवात केली होती. यंदाच्या सीझनचा पहिला कॅप्टन होण्याचा मान अंकिताला मिळाला. या आठवड्यात अंकिता नॉमिनेट आहे. पण, चाहत्यांकडून तिला फूल सपोर्ट असल्याचं पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकारबिग बॉस मराठी