बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनच्या ग्रँड फिनालेला दोन दिवस बाकी आहेत. रविवारी ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले रंगणार आहे. ग्रँड फिनालेला अवघे काहीच तास शिल्लक असताना आज बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. काल वर्षा उसगांवकर घराबाहेर पडल्यावर उर्वरीत टॉप ६ स्पर्धक फायनलला जातील अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु या टॉप ६ पैकी आणखी एक स्पर्धक आज घराबाहेर जाणार आहे.
आज आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार
"बिग बॉस मराठीच्या या सीझनचे टॉप ६ फायनलिस्ट मी जाहीर केले. आणि इथेच येतोय ट्विस्ट. आता आपल्याला कळेल कोण आहे टॉप ५." बिग बॉसने अशी घोषणा करताच आनंदी असलेल्या सदस्यांचे चेहरे पडतात. निक्कीला धक्का बसून ती जान्हवीच्या खांद्यावर डोकं ठेवते. अभिजीत, DP आणि सर्वांनाच धक्का बसतो. अशाप्रकारे आज बिग बॉस मराठीमधून आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. अंकिता, निक्की, अभिजीत, जान्हवी, सूरज, धनंजय या सहा जणांपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
वर्षा उसगांवकर गेल्या घराबाहेर
महाराष्ट्राची वंडर गर्ल अशी ओळख असणाऱ्या वर्षा उसगांवकर काल बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्या आहेत. या आठवड्यात निक्की तांबोळीने तिकीट टू फिनालेमध्ये बाजी मारल्याने फायनलमध्ये निक्कीने तिचं स्थान पक्क केलंय. त्यामुळे या आठवड्यात निक्की सोडून वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे सहा जण नॉमिनेट होते. त्यापैकी वर्षा उसगांवकर यांना आज मिड वीक एविक्शनमध्ये घराबाहेर जावं लागलंय.