Join us  

आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयने घेतलं होतं वर्षा यांचं नाव! 'या' सिनेमात दोघांनी केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 1:53 PM

तुम्हाला माहितेय अक्षय आणि वर्षा यांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.  त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या आजही पसंतीस पडतात. सध्या वर्षा उसगांवकर 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. या आठवड्यात त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्याला कारणही तेवढंच खास आहे. आठवड्याचा विकेंडचा वार म्हणजेच भाऊचा धक्क्यावर थेट खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) पोहचला. यावेळी एकमेंकाना पाहताच अक्षय आणि वर्षा दोघेही भलतेच खुश झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्हाला माहितेय अक्षय आणि वर्षा यांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. एवढंच नाही तर एकदा सर्वात आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयने वर्षा उसगांवकर यांचं नावही घेतलं होतं. 

नुकतंच अक्षय हा 'खेल खेल में' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर पोहचला. यावेळी वर्षा उसगांवकर यांना पाहाताच त्याने 'वर्षा...खूप वर्षांनी दिसली तू' असं म्हटलं. हे ऐकताच वर्षा उसगांवकरदेखील लाजताना पाहायला मिळाल्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. वर्षा उसगांवकर जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करत होत्या, त्यांनी त्यांनी अक्षयसोबत एक चित्रपट केला होता.  तो सिनेमा होता Hatya The Murder. हा सिनेमा त्याकाळी चांगलाच गाजला होता. २००४मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

Hatya The Murder या सिनेमात अक्षयसोबत काम करतानाच्या आठवणी वर्षा यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितल्या होत्या. त्या म्हणाल्या, "Hatya The Murder सिनेमासाठी अक्षयसोबत दिल्लीत शुटिंग केलं. त्यावेळी काही फोटो काढण्यासाठी लोक जमा झाले. तेव्हा त्यात मद्यधुंद अवस्थेत एक फोटोग्राफर आला होता. तेव्हा अक्षयने त्याला चांगलंच फटकारलं होतं. त्यावेळी अक्षय मला असं प्रोटेक्ट करतोय पाहून खूप छान वाटायचं". विशेष म्हणजे एका मुलाखतीमध्ये जेव्हा अक्षयला तुमची आवडती अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हाही त्यानं वर्षा यांचं नाव घेतलं होतं. ही खास आठवण वर्षा यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितली होती. 

वर्षा यांनी रजनीकांत, नाना पाटेकर, जितेंद्र, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला दूध का कर्ज हा त्यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यानंतर हनीमून, शिकारी, साथी, इंसानियत के देवता, मुकदमा, तिरंगा आणि चेहरा या सिनेमातही त्या झळकल्या होत्या.  अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत विविध भूमिका गाजवल्या आहेत.  

टॅग्स :वर्षा उसगांवकरसेलिब्रिटीअक्षय कुमारबॉलिवूडबिग बॉस मराठी