Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीमध्ये आता धमाल पाहायला मिळत आहे. सध्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू झाला असून या टास्कमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. यावेळी अंकिता, पॅडी आणि अभिजीत हे संग्रामवर थोडे नाराज झालेले पाहायला मिळाले. याच दरम्यान वर्षा उसगांवकर आणि धनंजय पोवार या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे.
"तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही" असं म्हणत वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने शड्डू ठोकल्याचं दिसत आहे. वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि संग्राम चौगुले यांना धनंजय टास्कबद्दल सांगत असतो. धनंजय म्हणतो, "पहिल्या फेरीमध्ये संग्राम, जान्हवी आणि अरबाजमध्ये डील ठरलं होतं."
धनंजय त्यानंतर वर्षा उसगांवकर यांना विचारतो, "तुम्हाला मी हेच सांगितलं होतं ना?" त्यावर वर्षाताई, "नाही" असं म्हणतात. त्यानंतर तो खूप चिडला आणि "मी सगळ्यांच्या तोंडावर बोलतो" असं म्हणाला. त्यावर वर्षा उसगांवकर "तू उगाच ओरडू नकोस" असं सांगतात. तेव्हा "तुम्ही ओरडायला भाग पाडत आहात, कारण तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही" असं उत्तर धनंजयने त्यांना दिलं आहे.
वर्षा उसगांवकर म्हणतात, "तू तोंडावर पडला आहेस" त्यांच्या या बोलण्यावर धनंजय म्हणतो, "तोंडावर पडत नाही शड्डू ठोकून उभा राहतोय मी" हे म्हणताना धनंजय शड्डू ठोकताना दिसत आहे. कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. वर्षाताई आणि DP मध्ये झालाय कल्ला, घरात कोणाच्या डील ठरल्यात? असं कॅप्शन दिलं आहे.