Bigg Boss Marathi : 'बिग बॉस' हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे सगळेच पर्व आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. 'बिग बॉस'च्या घरात काही सेलिब्रेटी एकाच घरात राहातात आणि त्यानंतर त्यांच्यात काही वाद होतात, तर काही वेळा अनेकांमध्ये खूप चांगली मैत्री होते. काही वेळा तर काहीजणांमध्ये प्रेमांकूर फुलताना देखील दिसतात. पण हा कार्यक्रम हा "स्क्रिप्टेड" असतो असा प्रेक्षकांचा आक्षेप आहे. आता 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाचा नवाकोरा होस्ट रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) यावर खुलासा केला आहे.
'बिग बॉस' मराठीचं पाचवं (Bigg Boss Marathi 5) पर्व लवकरच सुरु होतेय. हे पर्व मराठमोळा लयभारी अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. रितेशला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतंच 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी रितेशनं अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याला विचारण्यात आलं की 'बिग बॉस' हा शो स्क्रिप्टेड असतो का? या प्रश्नावर उत्तर देत तो म्हणाला, 'अजून माझ्याकडे या शोची स्क्रिप्ट आली नाही. म्हणून सध्या अन-स्क्रिप्टेडचं चालू आहे'.
'बिग बॉस' मराठीचं पाचवं पर्व हे येत्या २८ जुलै रोजी सुरू होणार आहे. २८ जुलैला शोचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये मानसी नाईक, अंकिता वालावलकर, संजू राठोड, प्रणव रावराणे हे कलाकार दिसण्याची शक्यता आहे.
रितेश देशमुखला 'बिग बॉस'मध्ये होस्टच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बिग बॉस' हिंदीत सलमानची वेगळीच क्रेझ आहे. 'बिग बॉस' ओटीटीमध्ये अनील कपूर यांचं होस्टिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. तर मराठी 'बिग बॉस'मध्ये महेश मांजरेकरांनी केलेल्या होस्टिंगनेही प्रेक्षकांची मन जिंकली होती. आता रितेशसमोर मोठं आव्हान असणार आहे.