Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी ५'च्या दुसऱ्या आठवड्यातच घरातील खेळ अधिक रंगल्याचं पाहायला मिळत आहे. घरात टिकून राहण्याच्या शर्यतीत स्पर्धक आक्रमक होताना दिसत आहे. नुकतंच घरातील पहिलं कॅप्टन्सी कार्य पार पडलं. या कार्यात दोन्ही टीममध्ये जोरदार बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. वर्षा उसगावकर या कार्याच्या संचालक होत्या. त्यामुळे त्यांना अंतिम निर्णय द्यायचा होता. यावेळी जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वर्षा उसगावकरांबद्दल बोलताना जान्हवीची जीभ घसरली.
कॅप्टन्सी कार्यात दोन्ही इंजिनच्या डब्यात कोण बसलं? याचा अंतिम निर्णय वर्षा उसगावकर यांना द्यायचा होता. त्यांनी अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत यांची नावं घेतली. अभिजीतबरोबर अरबाजही तिथे बसलेला होता. त्यामुळे अभिजीत नव्हे तर अरबाज बसला आहे, असं जान्हवी, निक्की आणि वैभव वर्षा ताईंना ओरडून सांगत होते. पण, वर्षा उसगावकरांनी त्यांचा निर्णय बदलला नाही. त्यामुळे त्यानंतर वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अरबाज, जान्हवी वर्षा ताईंना तुम्ही अनफेअर खेळत आहात असं म्हणत होते. त्यावर मी योग्य निर्णय दिला आहे, फेअर खेळत आहे, असं वर्षा उसगावकर म्हणाल्या. त्यानंतर जान्हवीचा पारा चढला. ती त्यांना म्हणाली, "हे बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही फेअर खेळलेल्या नाहीत. यांचा बॉस अभिजीत तिथे बसला आहे. हे सगळे त्याचे नोकर आणि चमचे आहेत".
पुढे अरबाज आणि वैभवही त्यांना अनफेअर खेळल्याचं म्हणत होते. अरबाज ओरडून ओरडून "आता तुम्ही कसं खेळता तेच मी बघतो. कोणालाच ट्रेनमध्ये चढू देणार नाही", असं म्हणत होता. त्यावर वर्षा उसगावकर त्याला "आक्राळ विक्राळ चेहरे करू नका", असं म्हणाल्या. त्यानंतर जान्हवीने पुन्हा वर्षा ताईंचा अपमान केला. ती त्यांना म्हणाली, "तुम्ही करता ते घाणेरडे चेहरे...आम्ही बघायचे का तुमचे घाणरडे चेहरे..घाणेरडा गेम खेळलात".
दरम्यान, या दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील पहिलं कॅप्टन्सी कार्य पार पडलं आहे. या कॅप्टन्सी कार्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घरातील यंदाच्या आठवड्याची कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अंकिता वालावलकरला बिग बॉस मराठी ५चा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळाला आहे.