Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये अभिनेता पंढरीनाथ कांबळेही सहभागी झाला आहे. प्रेक्षकांना विनोदाने हसवणारा पॅडी पहिल्या आठवड्यात घरात फारसा कुठेच दिसला नव्हता. रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सल्ला दिल्यानंतर पॅडीने त्याचा गेम दाखवायला सुरुवाक केली. आता पॅडी घरातील सदस्यांना चोख उत्तर देण्याबरोबरच गेममध्ये शक्कलही लढवताना दिसतो. पण, बिग बॉसच्या घरात जान्हवी किल्लेकरने पॅडीचा अपमान केला होता. जान्हवीने पॅडीला त्याच्या अभिनयावरुन हिणवल्यानंतर अनेक सेलब्रिटींनी याबाबत पोस्ट करत पॅडीला पाठिंबा दिला होता. आता दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी पॅडीला पाठिंबा देत त्याच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.
राजेश देशपांडे यांनी पॅडीबरोबरचा सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पॅडीबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. त्याबरोबरच पॅडीला पाठिंबाही त्यांनी दिला आहे.
राजेश देशपांडे यांची पॅडीसाठी पोस्ट
आमचा पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे उर्फ छू...खऱ्या अर्थाने हाडाचा कलावंत. काही वर्षांपूर्वी तो लोकल ट्रेन मधून फर्स्ट क्लासमधून प्रवास करायचा तेव्हा त्याला पांढर कपडी अत्तरधारी फर्स्ट क्लासी लोक "अरे ये फर्स्ट क्लास है,नीचे उतरो" म्हणून अपमानित करायचे.त्यांना काय माहित हा कोण आहे तो? तेव्हा पॅडीला मी एक सल्ला दिला होता की असं पुन्हा कुणी बोलले तर त्याला जबाब दे "ये फर्स्ट क्लास है? तो फिर आप यहां क्या कर रहें हो?" आणि पॅडी माझ्या गंगुबाई मधील संवादाप्रमाणे हा पण संवाद वापरू लागला. त्यातून तो ट्रेनच्या डब्यात पण हशा मिळवू लागला. आताही मी त्याला हाच सल्ला देईन की तिथे एवढंच बोल "आप यहां क्या कर रहें है?"
काय म्हणाली होती जान्हवी?
'बिग बॉस'च्या घरात पार पडलेल्या सत्याचा पंचनामा या टास्कदरम्यान जान्हवीने पॅडी कांबळेचा जोकर म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तिने पॅडीला त्याच्या कामावरुन आणि अभिनयावरुनदेखील हिणवलं. "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत", असं जान्हवी पॅडीला म्हणाली.